Join us  

राष्ट्रवादी आणि काँग्रेस ‘श्रद्धा आणि सबुरी’च्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2019 6:36 AM

राष्टÑवादीचे नेते शरद पवार नाशिकचा दौरा सोडून मुंबईत परत आले. त्यांनी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सध्या श्रद्धा आणि सबुरीच्या भूमिकेत आहे. भाजप कोणती भूमिका घेते, शिवसेना सत्तेत सहभागी होते की नाही, जर झाली नाही तर त्यासाठी ते कोणती कारणे पुढे करतात, या सगळ््यांचा विचार करुनच हे दोन्ही पक्ष आपापल्या भूमिका जाहीर करतील, असे ठरल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्टÑवादीचे नेते शरद पवार नाशिकचा दौरा सोडून मुंबईत परत आले. त्यांनी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. बैठकीस जाताना छगन भुजबळ यांनी ‘आता नाही तर कधीच नाही’ अशी शिवसेनेची स्थिती झाली आहे. ते लक्षात घेऊनच शिवसेनेने आपली पावले टाकायला हवीत, असा सल्ला माध्यमांशी बोलताना दिला. मात्र त्यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही नेत्याने पत्रकारांशी या विषयावर बोलणे टाळले.पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण हे नेते दिल्लीत आहेत. ते रविवारी मुंबईत येणे अपेक्षित आहे. ते आल्यानंतरच दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित जाऊन राज्यातील ओल्या दुष्काळाबाबत राज्यपालांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. राजकीय परिस्थितीवर मात्र जे काय करायचे ते सरकार स्थापनेनंतर होणाऱ्या पहिल्या अधिवेशन ठरवू, तोपर्यंत श्रद्धा आणि सबुरीवर विश्वास ठेवू, असे मत राष्टÑवादीच्या एका नेत्याने व्यक्त केले.

टॅग्स :काँग्रेसबाळासाहेब थोरात