Join us  

नाशिकच्या मादी बछड्याचे मुंबई करणार संगोपन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 2:24 AM

उसाच्या शेतात बिबट्या मादीने सोडलेला बछडा आढळला

- सागर नेवरेकर मुंबई : नाशिक जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रामधील सामनगाव येथील पळसे गावात उसाच्या शेतात बिबट्या मादीने सोडलेला बछडा २९ जानेवारी रोजी ऊसतोड कामगारांना आढळला. बछड्याला आईची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु हा प्रयत्न अपयशी ठरला. त्यामुळे या बछड्याच्या संगोपनाची जबाबदारी आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने घेतली आहे. त्यानुसार, मंगळवारी या बपळसे या गावातील रहिवासी जयंत साठे यांच्या उसाच्या शेतात ऊसतोड सुरू असताना कामगारांना अंदाजे १० ते १५ दिवसांच्या बिबट्या मादीचा बछडा आढळून आला.

२९ जानेवारी ते २ फेबु्रवारी दरम्यान दररोज सायंकाळी घटनास्थळी जाऊन बछड्याला कॅरेटमध्ये ठेवून कॅमेरा ट्रॅपिंग लावण्यात आले होते. बछड्याची प्रकृती सुदृढ असून त्याचे संरक्षण व देखभाल संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होऊ शकते. बछड्याला नाशिक वनपरिक्षेत्राचे सहायक वनसंरक्षक गणेश झोळे व वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी उद्यान प्रशासनाकडे सुपूर्द केले. बच्छड्याची देखभाल प्राणीरक्षक मुकेश मोरे व त्यांचा चमू घेत आहे.

यासंबंधी सुनील लिमये यांनी नाशिकच्या सहायक वनसंरक्षकांशी बोलणे करून बछड्याच्या पुढील संगोपनासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बछड्याला आणण्यात आले आहे. सध्या उद्यानातील बंगला क्रमांक ८ येथे बछड्याला ठेवण्यात आले आहे. ही बछडा मादी असून ती २० दिवसांची आहे, अशी माहिती सिंह व व्याघ्र वन्यपरिक्षेत्र अधिक्षक विजय बारब्दे यांनी दिली.

नाशिकमध्ये १५ ते २० दिवसांची बिबट्या मादी उसाच्या शेतात सापडली. सद्यस्थितीला बछड्याला जगवणे गरजेचे आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तशी व्यवस्था आहे. त्यामुळे या बछड्याला उद्यानात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. येऊरचा बिट्टू बॉसही जोडीला आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे आणि त्यांची टीम दोन्ही बछड्यांची आईसारखी काळजी घेत आहेत.- सुनील लिमये,अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (पश्चिम विभाग)

टॅग्स :बिबट्यामुंबईमहाराष्ट्र