नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!

By अतुल कुलकर्णी | Updated: April 27, 2025 12:40 IST2025-04-27T12:40:30+5:302025-04-27T12:40:57+5:30

गेल्या काही दिवसांपासून आपण जी विधाने करत आहात, ज्या वेगवेगळ्या कविता करत आहात, त्यामुळे मराठी साहित्याला ज्ञानपीठ दर्जाचा साहित्यिक मिळेल की काय अशी शंका मनात निर्माण झाली आहे.

Naresh Mhaske is moving towards Jnanpith, be careful | नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!

नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!

अतुल कुलकर्णी संपादक, मुंबई

खासदार नरेश म्हस्के 
नमस्कार 
गेल्या काही दिवसांपासून आपण जी विधाने करत आहात, ज्या वेगवेगळ्या कविता करत आहात, त्यामुळे मराठी साहित्याला ज्ञानपीठ दर्जाचा साहित्यिक मिळेल की काय अशी शंका मनात निर्माण झाली आहे. पण ज्ञानपीठ म्हणजे काय हे कुणाला विचारू नका. आपल्याला तो पुरस्कार  मिळू नये म्हणून विरोधक फिल्डिंग लावतील. आपण अत्यंत वास्तवदर्शी बोलता. कोणाला राग येईल, वाईट वाटेल, याचा कसलाही विचार न करता बेधडक बोलता. त्यामुळेच आपल्याला शिंदेजींनी लोकसभेवर पाठविले. कधीकाळी आपल्या निष्ठा बाळासाहेबांसोबत होत्या. नंतर उद्धव ठाकरेंसोबत होत्या. त्यावेळी जितक्या प्रखरपणे आपण बोलत होता, त्यापेक्षा जास्त प्रखरपणे आता बोलता याचे आम्हाला कौतुक आहे.
 
‘जे लोक कधीही विमानात बसले नाहीत, त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानात बसवून आणले,’ असे विधान आपण नुकतेच केले. पहलगाम हल्ल्यात राज्यातील सहा पर्यटक ठार झाले. काश्मीरच्या विविध भागांत अडकलेल्या पर्यटकांना माघारी आणण्यासाठी राज्य सरकारने मोहीम हाती घेतली. संकटमोचक गिरीश महाजन यांना सरकारने तिथे पाठविले होते. आपले साहेबही विशेष विमानाने तेथे गेले. त्यातल्या काहींना त्यांनी मुंबईत आणलेदेखील. त्यामुळेच आपण, ‘जे लोक कधीही विमानात बसले नव्हते त्यांना विमानात बसवून आणले. पहलगामला गेलेल्यांत ४५ पर्यटक हे गरीब होते. ते रेल्वेने गेले होते, त्यांची खाण्याची पंचाईत होती. त्यांना शिंदे यांनी विमानातून सुखरूप परत आणले’, असेही आपण सांगितले. त्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली. टीका करण्याशिवाय त्यांना येते तरी काय..? तुम्ही चिंता करू नका. तुम्ही अशीच विधाने करत राहा. यामुळे आपली आणि आपल्या पक्षाची प्रतिष्ठा वाढते हे लक्षात ठेवा. कश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांची खाण्यापिण्याची पंचाईत होती, असे आपण म्हणाल्याची तक्रार जितेंद्र आव्हाड यांनी दिल्लीत भाजप श्रेष्ठींकडे केल्याची माहिती आहे. याचा अर्थ केंद्र सरकारने तिथे कसलीही व्यवस्था केली नव्हती, असा निघतो का? तसे काही असेल तर आपली अडचण होऊ नये, म्हणून हा मुद्दा आपल्या लक्षात आणून दिला.

हल्ली तुमचे फॉलोवर्स खूप वाढले आहेत. चॅनलवाले सकाळी सकाळी जसे संजय राऊतांकडे जातात, तसेच त्यांनी आपल्याकडे यावे, अशीही एक व्यवस्था लावून टाका. संजय राऊत काही बोलण्याआधीच तुम्ही सकाळी एक शेलका बॉम्ब फोडत जा. म्हणजे दिवसभर सगळे त्याभोवती चर्चा करत राहतील. त्यातून आपल्या पक्षाचे वजन वाढेल. पक्षातल्या नेत्यांकडे बघण्याची दृष्टी एकदम भारी होईल. राऊतांविषयी आपण जी काही विधाने केली, ती आम्हाला लिहिता येणार नाहीत. आमची तेवढी पात्रता नाही. संजा...गांजा... ढॅंचू ढॅंचू... ओकणे... लांडगे... भोंगे... हे एवढेच काही मोजके शब्द आम्ही तुमच्या बोलण्यातले घेऊ शकलो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण मराठी शब्दकोशात जी भर घालत आहात, कवितेच्या प्रांतात जे नवनवे प्रयोग करत आहात त्यामुळे आमची छाती अभिमानाने भरून आली आहे..! 
आम्ही बकरे आहोत की वाघ
ते ठरवलंय जनतेने
मला वाटतं, जास्त भेकू नये 
गप्प बसावं गाढवाने... 

नवाच्या भोंग्याने, 
दिली पुन्हा बांग
पुन्हा एकदा नको तिथे, 
घातली बघ टांग

मालकाने टाकलेलं खाऊन बें बें रोज सकाळी करायचं जगातल्या कोणत्याही विषयावर मूर्खासारखं बरळायचं  या आणि अशा काही कविता आपले नवे शिक्षणमंत्री दादा भुसे यांना सांगून अभ्यासक्रमातच लावायला सांगितल्या तर कसे होईल..? चारोळी हा मराठी साहित्यातला एक अभिनव प्रकार आहे. आपण इतक्या अभिनव चारोळ्या करत आहात, त्यामुळे मराठी साहित्याचे कवितेचे चांगले दिवस लवकरच येतील असे आम्हाला वाटते. आपल्याला जसा वेळ मिळेल तसे आपण चारोळ्या कशा करायच्या यावर प्रशिक्षण वर्ग घेतले पाहिजे, वेगवेगळ्या पक्षाचे तरुण नेते आपल्याकडे नक्कीच शिकवणीसाठी येतील. 

आपल्या चारोळ्यांमधून संजय राऊत यांच्यावरचे आपले विशेष प्रेम लपून राहत नाही. ज्या पद्धतीने आपण त्यांच्यावर चारोळ्या करता, ते पाहून संजय राऊत फक्त आपल्यालाच घाबरत असतील, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. म्हणूनच ते आपल्या कोणत्याही विधानावर प्रतिक्रिया देत नसावेत. आपली कीर्ती आता हळूहळू ठाण्याच्या बाहेर पसरत आहे. ती महाराष्ट्रभर पसरावी असे आम्हाला वाटते. त्यासाठी आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांवर चारोळ्या केल्या पाहिजेत किंवा अशा चारोळ्यांचे एखादे पुस्तक प्रकाशित करा. आपल्या चारोळी वाचनाचा नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, पुणे, नाशिक अशा वेगवेगळ्या शहरांत कार्यक्रम ठेवायला पाहिजे. म्हणजे आपली वाटचाल ज्ञानपीठ पुरस्काराच्या दिशेने होऊ लागेल. आपल्याला खूप खूप शुभेच्छा.      - आपलाच बाबूराव

Web Title: Naresh Mhaske is moving towards Jnanpith, be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.