महिलांच्या योगदानाचा नरेंद्र मोदींनाही विसर !
By Admin | Updated: January 6, 2015 02:29 IST2015-01-06T02:29:43+5:302015-01-06T02:29:43+5:30
विज्ञान क्षेत्रात महिलांनी प्रगती केली आहे. मात्र अजूनही बरेच टॅलेंट महिलांमध्ये असून, त्यासाठी पोषक वातावरणाचा काहीसा अभाव आहे.

महिलांच्या योगदानाचा नरेंद्र मोदींनाही विसर !
मुंबई : विज्ञान क्षेत्रात महिलांनी प्रगती केली आहे. मात्र अजूनही बरेच टॅलेंट महिलांमध्ये असून, त्यासाठी पोषक वातावरणाचा काहीसा अभाव आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये उपस्थिती दर्शवूनही महिलांच्या योगदानाबद्दल ‘ब्र’ देखील काढला नाही, अशी नाराजी वूमन्स सायन्स काँग्रेसमधील वैज्ञानिकांनी व्यक्त केली.
विद्यापीठात आयोजित केलेल्या वूमन्स सायन्स काँग्रेसमध्ये सोमवारी ‘जेंडर डिस्क्रिमनेशन इन सायन्स’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात डॉ. गीता चड्ढा, छायानिका शहा, डॉ. प्रज्ज्वल शास्त्री, डॉ. विनीता बाल, डॉ. अमिथा कुरुप आणि जयश्री सुब्रमण्यम हे सहभागी झाले होते. या वेळी महिला वैज्ञानिकांनी विज्ञान क्षेत्रातील महिलांची सद्य:स्थिती, त्यांच्यासमोरील आव्हाने, वैज्ञानिक संस्थांची भूमिका, शासकीय धोरणे अशा विषयांवर विचार मांडले. याप्रसंगी ‘शासकीय प्राधिकरण महिला वैज्ञानिकांचा गांभीर्याने विचार का करीत नाही?’ यावर डॉ. विनीता बाल यांनी विचार व्यक्त केले. त्यात गेल्या कित्येक वर्षांपासून महिलांना या क्षेत्रात प्रोत्साहन देण्यात शासनाकडून गांभीर्याने विचार होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)