कुडाळ-मालवणमधून नारायण राणे लढणार
By Admin | Updated: September 15, 2014 00:07 IST2014-09-14T23:15:55+5:302014-09-15T00:07:18+5:30
पहिली यादी बुधवारी : विरोधकांकडे मुद्देच नाहीत

कुडाळ-मालवणमधून नारायण राणे लढणार
कणकवली : पक्षाच्या आदेशाप्रमाणे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे, असे काँग्रेस प्रचार समितीचे प्रमुख आणि राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कणकवली येथे जाहीर केले.
भाजप व शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदावरून राजकीय स्वार्थापोटी वाद सुरू आहेत. विरोधकांकडे प्रचारासाठी कोणतेही मुद्दे नसून, गेल्या १५ वर्षांत काँग्रेस आघाडी शासनाने केलेली विकासकामे हाच आमचा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा असेल, असेही त्यांनी सांगितले.उद्योगमंत्री राणे दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असून, कणकवली येथे पत्रकार परिषदेत आगामी विधानसभेतील काँग्रेसच्या प्रचार यंत्रणेबाबत त्यांनी माहिती दिली. यावेळी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य नीतेश राणे, कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, आदी उपस्थित होते.मंत्री राणे म्हणाले, १ सप्टेंबरला मुंबई येथील हुतात्मा चौक येथे काँग्रेसने अखंड महाराष्ट्र ठेवण्याची प्रतिज्ञा करून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. १७ सप्टेंबरला या निवडणुकीसाठीची उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल, असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले आहे. विरोधकांनी जनतेची केलेली फसवणूक, दिलेल्या आश्वासनांची न केलेली पूर्तता, वाढती महागाई, असे मुद्दे घेऊन आम्ही प्रचारात उतरणार आहोत. देशाची परिस्थिती विचारात न घेता केंद्र शासनाकडून नियोजन केले जात असल्यानेच ‘जन-धन’सारख्या योजना फसत आहेत. त्यामुळे हे मुद्देही प्रचारात उपस्थित केले जाणार आहेत. गेल्या १५ वर्षांत काँग्रेस आघाडी शासनाने केलेली विकासकामे यांचाही समावेश प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये असेल. महाराष्ट्र राज्य सर्व क्षेत्रात आघाडीवर असून, राज्य चालविण्याची क्षमता असलेल्या नेत्यांचा दुष्काळ भाजप तसेच शिवसेनेमध्ये आहे.त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत जनता आम्हालाच कौल देईल. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबाबतची सूत्रे दोन-चार दिवसांत निश्चित होतील, अशी अपेक्षाही राणे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, सिंधुदुर्गसह कोकणात काँग्रेसचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न राहणार आहेत. कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसकडून नीतेश राणे यांचे एकमेव नाव असून, उमेदवारांच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे. कासार्डे एमआयडीसी तेथील जनतेला नको असल्याने रद्द केली आहे. तेथील जनता ज्यावेळी एमआयडीसी आपल्याला हवी असे सांगेल, त्यावेळी पुन्हा त्याबाबत विचार करण्यात येईल, असेही मंत्री राणे यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)
उद्धव मुख्यमंत्री होणार नाहीत
शिवसेना-भाजप युतीची सत्ता येण्याबाबत संशयच आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी आपले नाव जाहीर केले आहे. अशी वेळ येणारच नाही, अशी त्यांना खात्री असल्यानेच त्यांनी फक्त प्रसिद्धीसाठी हे वक्तव्य केले आहे. ते कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत, याबाबत मला विश्वास आहे, असे राणे म्हणाले.
‘ते’ निवडणूक काय लढविणार?
विधानसभा निवडणुकीत बरेच अपक्ष येतील. मात्र, स्वत:च्या गावात ग्रामपंचायत सदस्य निवडून आणू शकत नाहीत, ते निवडणूक काय लढविणार? असा टोला आमदार विजय सावंत यांच्या उमेदवारीबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना राणे यांनी लगावला.
आघाडीव्यतिरिक्त कोणाला मदत नाही
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आपला उमेदवार देईल. राजन तेली काहीही म्हणत असतील, मात्र पक्ष तसेच आघाडी सोडून कोणालाही विधानसभा निवडणुकीत मदत करणार नाही, असेही राणे यांनी सांगितले.
साखर कारखाना हा विधानसभा निवडणुकीपुरता विषय
विजय सावंत यांच्याकडून उभारण्यात येणारा साखर कारखाना हा निवडणुकीपुरताच विषय आहे. या कारखान्याच्या नावावर बँकेत पैसे नाहीत. जिल्ह्यात पुरेसा ऊस होत नाही, तर कारखाना कसा उभारणार? साखर कारखाना उभारण्याची क्षमता विजय सावंत यांच्यात नाही, असेही राणे यांनी यावेळी सांगितले.