Join us  

नारायण राणे दिल्लीत जाणार; भाजपाची राज्यसभेची ऑफर स्वीकारली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 8:27 PM

सोमवारी ते राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

मुंबई: काँग्रेसचे माजी नेते आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांनी शनिवारी भाजपने दिलेला राज्यसभेतील खासदारकीचा प्रस्ताव मान्य केला. त्यामुळे ते आता अधिकृतरित्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील होणार आहेत. सोमवारी ते राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

येत्या 23 मार्चला राज्यसभेची निवडणूक होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे. विधानसभेतील संख्याबळाचा विचार केला तर भाजपाला ३ उमेदवार राज्यसभेवर पाठवता येतील. त्यामुळे या तीन जागांवर कोणाची वर्णी लागणार, याविषयी राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र, राणेंनी भाजपाची ऑफर स्वीकारल्याने भाजपाचा एक उमेदवार निश्चित झाला आहे. उर्वरित दोन जागांसाठी एकनाथ खडसे आणि प्रकाश जावडेकर यांच्या नावाची चर्चा आहे. सुरुवातीला नारायण राणे राज्यसभेवर जाण्यासाठी फारसे उत्सुक नव्हते. मात्र, भाजपाने त्यांचे मतपरिवर्तन करण्यात यश मिळवले. काही दिवसांपूर्वी  नितेश राणे यांनी केलेल्या एका ट्विटमुळे राणे यांना राज्यसभेची ऑफर अमान्य असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. नितेश यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राणे साहेबांनी दीर्घकाळ राज्याच्या राजकारणातच राहावे, अशी माझ्यासारख्या हितचिंतकांची इच्छा आहे. महाराष्ट्राला त्यांची आणखी गरज आहे. त्यामुळे राणे साहेबांनी राज्यसभा नव्हे तर विधानसभेत जावे, अशी आमची इच्छा आहे. राणेसाहेब आमची ही मागणी लक्षात घेतील, अशी आशा करतो. आम्ही त्यांच्या निर्णयाची प्रतिक्षा करत आहोत, असे नितेश यांनी म्हटले होते. परंतु राणेंच्या आजच्या निर्णयाने या सर्व चर्चांना विराम मिळाला आहे.  

शिवसेनेचा होता विरोधराणे यांना मंत्री करण्यास शिवसेनेचाविरोध होता. राणेंना मंत्री केल्यास सत्तेत राहण्याबाबत विचार करावा लागेल, असा इशारा शिवसेनेच्या नेतृत्वाने मुख्यमंत्र्यांना दिला होता. आता शिवसेनेच्या विरोधाचा प्रश्नही संपणार आहे.सहा जागांची निवडणूकराज्य विधानसभेतून सहा जण राज्यसभेवर निवडून जाणार असून त्यातील प्रत्येकी एक जागा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मिळेल. राष्ट्रवादीने वंदना चव्हाण यांना तर शिवसेनेने अनिल देसाई यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या नावाची अद्याप घोषणा झालेली नाही.भाजपाच्या वाट्याला असलेल्या तीन जागांपैकी केंद्रीय मनुष्यबळविकासमंत्री प्रकाश जावडेकर यांना उमेदवारी मिळाली आहे. राणे यांचे नाव निश्चित झाले आहे आणि तिसºया नावासाठी चुरस आहे. त्यासाठी विद्यमान राज्यसभा सदस्य अजय संचेती, संघ परिवारातील मुकुल कानिटकर आणिराज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, माजी मंत्री एकनाथ खडसेयांच्या नावांची चर्चा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री फडणवीस संचेतींसाठी प्रयत्नशील आहेत.

टॅग्स :नारायण राणे भाजपा