Join us

अंधेरीतील रस्त्याचे 'नटश्रेष्ठ विक्रम गोखले' नामकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 20:43 IST

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते अनुपम खेर आणि परेश रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत या रस्त्याचे 'नटश्रेष्ठ विक्रम गोखले मार्ग' असे नामकरण करण्यात आले.

मुंबई - आपल्या बहारदार अभिनयाने मराठी रंगभूमीपासून मराठी-हिंदी सिनेसृष्टीचा रुपेरी पडदा गाजवणाऱ्या दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचे नाव अंधेरीतील रस्त्याला देण्यात आले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते अनुपम खेर आणि परेश रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत या रस्त्याचे 'नटश्रेष्ठ विक्रम गोखले मार्ग' असे नामकरण करण्यात आले.

विक्रम गोखलेंच्या प्रथम स्मृती दिनाचे औचित्य साधत सिंटा टॉवरच्या बाजूला असलेल्या मार्गाला नटश्रेष्ठ विक्रम गोखले असे नाव देण्यात आले आहे. यावेळी गोखलेंच्या पत्नी वृषाली गोखले, अलका गोखले, आमदार भारती लव्हेकर, सिंटाचे सदस्य प्रीती सप्रू, बिंदु दारा सिंह, जॉनी लीव्हर, मनोज जोशी, अमित बहल, दर्शन जरीवाला, सुधांशु पांडे, टीना घई, दीपक काज़ीर केजरीवाल, हेतल परमार यांच्यासह बरेच कलाकार उपस्थित होते. गोखलेंच्या स्मृती जागवत अनुपम खेर म्हणाले की, गोखले जाण्या अगोदर दोन-तीन दिवसांपूर्वीच मी त्यांच्याशी शेवटचे बोललो होतो. 'सिग्नेचर' चित्रपटाचे शुटिंग संपवून मी परत आलो तेव्हा मी त्यांना म्हणालो की, 'अनुमती' या मराठी चित्रपटात तुम्ही इतके चांगले काम केले आहे की मी त्यातील १० टक्केही करू शकलो तरी मला खूप बरे वाटेल. त्यावर ते म्हणाले की, तुम्हीही चांगलेच केले असेल. 

रस्त्याला गोखलेंचे नाव दिल्याबद्दल फडणवीस यांचे आभार मानत परेश रावल म्हणाले की, इतक्या महान व्यक्तींच्या आठवणी जागवल्या जात असताना त्यांच्यासोबत जेव्हा आपले नाव जोडले जाते तेव्हा आपणही मोठे होतो. विक्रम गोखले हे एक संवेदनशील व्यक्ती होते. याची झलक त्यांच्या चित्रपटांमध्ये दिसल्यानेच त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्याकडे एक प्रकारची चुंबकीय शक्ती होती. अतिम वेळेपर्यंत ते काम करत राहिले. आपल्या सहकारी कलाकारांसाठी काम करणे, त्यांना मदत करणे आणि ज्येष्ठ कलाकार टिकून राहावेत म्हणून त्यांची जमीन सिंटाला देणे हा त्या'च्या संवेदनशीलतेचा पुरावा असल्याचेही रावल म्हणाले. विक्रम गोखले यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देवेंद्र फडवणीस यांनी सिंटाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. मराठी, गुजराती आणि बॉलीवूड अभिनेते मनोज जोशी यांनीही श्री विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांचे अनुभव सांगितले.

टॅग्स :अंधेरीविक्रम गोखले