बोगस डॉक्टरांचा शोध घेणारी समिती नावापुरतीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:13 IST2021-09-02T04:13:40+5:302021-09-02T04:13:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांना चाप लावण्यासाठी स्थापन केलेली समिती सध्या नावापुरतीच उरली आहे. ...

Named after the committee that found the bogus doctor | बोगस डॉक्टरांचा शोध घेणारी समिती नावापुरतीच

बोगस डॉक्टरांचा शोध घेणारी समिती नावापुरतीच

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांना चाप लावण्यासाठी स्थापन केलेली समिती सध्या नावापुरतीच उरली आहे. कोरोनाकाळात या समितीची एकही बैठक न झाल्याने शोधमोहीम पूर्णतः थांबली आहे. एखाद्या विभागातून तक्रार प्राप्त झाली तरच कारवाई होत असल्याने सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

बोगस डॉक्टर म्हणजे कोणतेही वैद्यकीय शिक्षण न घेता बनावट कागदपत्रांच्या आधारे रुग्णांवर उपचार करणारे महाभाग. त्यांची कोणत्याही मेडिकल कौन्सिलकडे नोंद नसते. परंतु, अत्यंत छुप्या पद्धतीने ते आपला गोरखधंदा सुरू ठेवून रुग्णांच्या आरोग्याशी खेळ करतात. त्यांच्यावर कारवाईचे अधिकार अँटी क्वेकरी सेलकडे आहेत. ती मुंबई पोलिसांच्या सूचनेनुसार काम करते. या सेलला सहकार्य करण्यासाठी बोगस डॉक्टर शोध समिती स्थापन करण्यात आली आहे. परंतु, कोरोनाकाळात या समितीची एकही बैठक न झाल्याने ही मोहीम थंडावली आहे.

.........

समितीत कोणकोण असतात?

पोलीस आयुक्त, पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे सदस्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार मंडळींचा बोगस डॉक्टर शोध समितीत समावेश असतो.

............

कारवाई कशी होते?

कारवाईचे अधिकार पोलिसांच्या अँटी क्वेकरी सेलकडे असतात. त्यांना प्रत्यक्ष तक्रार, मेडिकल कौन्सिलकडून मिळालेली माहिती आणि सूत्रांच्या आधारे ते बोगस डॉक्टरांपर्यंत पोहोचतात. संपर्ण चौकशी केल्यानंतर धाड टाकून संबंधित डॉक्टरची प्रमाणपत्रे तपासली जातात. मेडिकल कौन्सिलकडे नोंद आहे की नाही, याची पडताळणी केली जाते. अशी नोंद नसल्यास त्याच्यावर कारवाई केली जाते.

.............

आपल्याकडील महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कायदा फार जुना आहे. त्यात मेडिकल कौन्सिलकडे खूपच कमी अधिकार देण्यात आले आहेत. दिल्लीतील मेडिकल कौन्सिलला पूर्ण अधिकार आहेत. ते बोगस डॉक्टरांना पकडून पोलिसांच्या हवाली करू शकतात. महाराष्ट्रातही कायद्यात दुरुस्ती करून मेडिकल कौन्सिलच्या अधिकारात वाढ करण्याची मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांना चाप लावण्यास मदत होईल.

- डॉ. शिवकुमार उत्तुरे, अध्यक्ष, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल.

Web Title: Named after the committee that found the bogus doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.