सायनमधील चौकाला शहीद मुकेश जाधव यांचे नाव

By Admin | Updated: November 27, 2015 02:39 IST2015-11-27T02:39:31+5:302015-11-27T02:39:31+5:30

२६/११ च्या हल्ल्यात सीएसटी स्थानकावरील प्रवाशांना वाचवताना अतिरेक्याकडून झालेल्या गोळीबारात सायन कोळीवाडा येथे राहणाऱ्या मुकेश जाधव या होमगार्डला प्राण गमवावे लागले होते

Name of Shaheed Mukesh Jadhav in Chain of Sion | सायनमधील चौकाला शहीद मुकेश जाधव यांचे नाव

सायनमधील चौकाला शहीद मुकेश जाधव यांचे नाव

मुंबई : २६/११ च्या हल्ल्यात सीएसटी स्थानकावरील प्रवाशांना वाचवताना अतिरेक्याकडून झालेल्या गोळीबारात सायन कोळीवाडा येथे राहणाऱ्या मुकेश जाधव या होमगार्डला प्राण गमवावे लागले होते. या शहिदाची आठवण म्हणून सायन कोळीवाड्यातील एका चौकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. चौकाचे नामकरण काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. नामकरणासाठी स्थानिक नगरसेविका ललिता यादव यांनी पुढाकार घेतला होता.
कोळीवाड्यातील नेहरू नगर झोपडपट्टीत राहणारे जाधव हे २००५ साली होमगार्डमध्ये भरती झाले होते. २६/११ च्या रात्री दहशतवाद्यांनी सीएसटी रेल्वे स्थानकावर अंधाधुंदपणे गोळीबार सुरू केला. ही बाब जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी काही प्रवाशांना सुरक्षितस्थळी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. अतिरेक्याची एक गोळी लागून ते गंभीर जखमी झालेले असतानाही जिवाची पर्वा न करता त्यांनी ही बाब पोलीस नियंत्रण कक्षाला कळवली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
या परिसरातील चौकाला त्यांचे नाव द्यावे, या रहिवाशांच्या मागणीवर नगरसेविका ललिता यादव यांनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. नामकरणप्रसंगी माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार वर्षा गायकवाड, नगरसेविका ललिता यादव, स्लम सेलचे जिल्हा अध्यक्ष कचरू यादव आदी उपस्थित होते. या वेळी मुकेश जाधव यांच्या कुटुंबीयांसह अंबादास पवार यांच्या कुटुंबीयांचाही सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Name of Shaheed Mukesh Jadhav in Chain of Sion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.