पुनर्विकासाच्या नावाखाली माहीमच्या ‘नेचर पार्क’चा बळी, आदित्य ठाकरेंचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 03:36 IST2018-03-22T03:36:50+5:302018-03-22T03:36:50+5:30

पुनर्विकासाच्या नावाखाली माहीमच्या ‘नेचर पार्क’चा बळी, आदित्य ठाकरेंचा आरोप
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली राज्य सरकार निसर्गरम्य ‘माहीम नेचर पार्क’चा नाहक बळी देतेय, असा आरोप करत पर्यावरणवाद्यांनी गेले कित्येक दिवस याविरोधात आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. आता त्यांच्या मदतीला शिवसेनाही धावून आलीय. शिवसेना नेते आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी माहीम नेचर पार्कला भेट देली. जनभावना लक्षात न घेता, सरकार परस्पर माहीम नेचर पार्कचा भूखंड बिल्डरच्या घशात घालू पाहतेय, याविरोधात आम्ही प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा आदित्य ठाकरेंनी या वेळी दिला. त्यामुळे येत्या काळात नेचर पार्कवरून शिवसेना-भाजपामध्ये जोरदार ठिणगी उडण्याची चिन्हे आहेत.
भाजपा सरकारने आधी मेट्रोसाठी आरेतील झाडे तोडली. त्यानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झाडांवरही निर्दयीपण कुºहाड चालविली. आता सरकार माहीम नेचर पार्कच्या भूखंडावर डोळा ठेवतेय, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. या वेळी त्यांच्यासोबत महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सभागृहनेते यशवंत जाधव आणि शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे आदी उपस्थित होते.
‘बिल्डरच्या घशात भूखंड जाणार’ ही बातमी उजेडात आल्यानंतर, शिवसेना भयंकर आक्रमक झाली आहे. पूर्वी या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड होते. आता एसआरए प्रकल्पांतर्गत ‘मुंबईकरांना परवडणारी घरे’ या योजनेखाली सरकार बिल्डरांचा फायदा करण्याचा कुटिल डाव खेळत आहे. मात्र, शिवसेना हा डाव कदापी यशस्वी होऊ देणार नाही, असा नारा आदित्य ठाकरेंनी या वेळी लगावला. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही मोहीम मोठ्या थाटामाटात याच ठिकाणाहून सुरू करण्यात आली. आता बिल्डरांच्या फायद्यासाठी येथील हरित निसर्गाचा बळी दिला जातोय. या प्रकाराबाबत मुख्यमंत्री मूग गिळून गप्प का आहे, असा सवालही आदित्य ठाकरेंनी या वेळी केला. यात काहीतरी गौडबंगाल आहे. त्यामुळे शिवसेना या प्रश्नी अधिक पाठपुरावा करेल, असा विश्वासही त्यांनी माहीमवासीयांना दिला.
पर्यावरणवाद्यांकडून निषेध
भाजपा सरकारच्या या कुटिल कारस्थानाच्या विरोधात उठाव केला पाहिजे, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. यासाठी प्रत्येक मुंबईकराने यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
मुंबईकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून, तसेच थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेल पाठवून, या निर्णयाविरोधात आवाज उठवावा, तसेच मुंबईकरांनी आपला निषेध मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा विशेष कार्यकारी अधिकारी, धारावी पुनर्विकास प्रकल्प, गृहनिर्माण भवन, पाचवा मजला, वांद्रे पूर्व, मुंबई-५१ यांच्याकडे लेखी स्वरूपात नोंदवावा, असे आवाहनही पर्यावरणवाद्यांनी केले आहे.
असे आहे नेचर पार्क
माहीमचे हे नेचर पार्क ४१ एकर जागेत पसरलेले आहे. त्यात विविध प्रजातींची २०० झाडे आहेत. ८५ जातींची फुलपाखरे आहेत. हे पार्क १५४ जातींच्या पक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. ३२ जातींचे सरपटणारे प्राणी येथे आहेत. ही जागा सायन रेल्वे स्टेशनपासून २ मिनिटांवर असल्याने, शहरातील अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे.