सेन्सॉर बोर्डा, तुही यत्ता कंची..? तुही यत्ता...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2025 11:36 IST2025-03-02T11:35:09+5:302025-03-02T11:36:15+5:30
आपल्या पिढ्यांना नामदेव ढसाळ माहिती नसतील, त्यांच्या कविता समजणार नसतील, तर आपण आपल्या सांस्कृतिक, सामाजिक जाणिवांपासून हरवत चाललो आहोत, असं म्हणावं लागेल...

सेन्सॉर बोर्डा, तुही यत्ता कंची..? तुही यत्ता...
दुर्गेश सोनार, सहायक संपादक
नामदेव ढसाळ यांच्या कविता या सेन्सॉरशिपच्या चौकटीत बसणाऱ्या कधीच नव्हत्या. आपल्या पिढ्यांना नामदेव ढसाळ माहिती नसतील, त्यांच्या कविता समजणार नसतील, तर आपण आपल्या सांस्कृतिक, सामाजिक जाणिवांपासून हरवत चाललो आहोत, असं म्हणावं लागेल...
अभिजात मराठी भाषेचा गौरव दिन सगळीकडे उत्साहात साजरा होत होता; पण तरीही गटणे मास्तर कमालीचे अस्वस्थ होते. शाळेत मराठीचा गुणगौरव करणारा कार्यक्रम करून ते नुकतेच घरी परतले होते. वामकुक्षीच्या आधी थोडा वेळ बातम्या पाहाव्यात म्हणून त्यांनी टीव्ही लावला तर समोर ब्रेकिंग न्यूज सुरू होती. ‘सेन्सॉर बोर्डाने विचारले की, नामदेव ढसाळ कोण? आम्ही नाही ओळखत..!’ गटणे मास्तरांच्या डोळ्यांवर आलेली झोप क्षणार्धात उडाली. अरे ही ब्रेकिंग कसली? ही तर हॉर्ट ब्रेकिंग न्यूज आहे... असं ते स्वतःशीच पुटपुटले. ज्यांनी मराठी कवितेला ‘आता सूर्यफुलासारखे सूर्योन्मुख झालेच पाहिजे...’ असा विद्रोही आशावाद दिला, ते नामदेव ढसाळ सेन्सॉर बोर्डाला माहिती नसावेत! सोयिस्कर विस्मरणाचा हा नवा सांस्कृतिक डाव तर नाही ना... अशी शंका गटणे मास्तरांना आली.
त्यांनी तडक कपाटातली ढसाळांची पुस्तकं काढली. गोलपीठा, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले, तुही यत्ता कंची? तुही यत्ता..., मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे, या सत्तेत जीव रमत नाही, मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे... असे एक ना अनेक कवितासंग्रह त्यांनी हातात घेतले आणि एक एक पान चाळायला सुरुवात केली. ज्या ढसाळांनी दलित पँथरसारखं संघटन उभारत शोषितांच्या संघर्षाला आवाज दिला, रस्त्यावर उतरत कवितांमधून क्रांतीची ज्योत पेटविली, गोलपीठासारख्या अंधारलेल्या वस्त्या-वस्त्यांमधून दबलेल्या, पिचलेल्या पीडितांना त्यांच्याच बोलीतून साहित्यिक जाणिवांचं अधिष्ठान दिलं, त्या ढसाळांवरील ‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाला आक्षेपार्ह कसा काय वाटू शकतो? गटणे मास्तरांच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं.
जिवंतपणीच ज्यांच्या वाट्याला नरकासारखं जिणं आलं, त्यांच्यासाठी मेल्यानंतरच्या स्वर्गसुखाचं अप्रूप ते काय? असं जळजळीत भाष्य करणाऱ्या ढसाळांना त्यांच्या मृत्युपश्चातही जीव कोंडून गेल्यासारखं वाटत असणार...
ढसाळांनी कवितेची पारंपरिक चौकट मोडून काढत आपल्या कवितांमधून समाजाच्या सडलेल्या असह्य वास्तवावर थेट भाष्य केलं होतं. त्यांच्या कवितांमध्ये क्रांती होती, संघर्ष होता, शोषितांच्या वेदनांचे निखारे होते. अशा लढवय्या कवीच्या कविता अश्लील ठरवल्या जात आहेत..! त्यात धक्कादायक म्हणजे, सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांना ‘ढसाळ कोण?’ हा प्रश्न विचारण्याइतपत विस्मृती आलेली आहे..! चित्रपटातून त्यांच्या कविता वगळण्याचा आदेश देऊन सेन्सॉर बोर्डाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालत एका चळवळीच्या सांस्कृतिक अधिष्ठानालाच धक्का लावला आहे, असं विचारचक्र गटणे मास्तरांच्या डोक्यात सुरू झालं.
ढसाळांच्या कवितेतली भाषा रांगडी होती, कारण ती वास्तवाची भाषा होती. त्यांच्या कवितांमध्ये शिव्या होत्या; पण त्यात शोषितांच्या व्यथा-वेदनांचे हुंकार होते. ढसाळांची लेखनशैली प्रस्थापित सौंदर्यशास्त्राची चौकट मोडणारी होती. त्यामुळेच जेव्हा ढसाळ कवी म्हणून पहिल्यांदा चर्चेत आले, तेव्हा काही प्रस्थापितांनी ‘आता रसाळ नामदेवाचा काळ गेला अन् ढसाळ नामदेवाचा काळ आला...’ अशी संभावना केली होती. ढसाळांच्या कवितांची ही अशी संभावना तेव्हापासूनच होत आली आहे. आता सेन्सॉर बोर्डानं त्यावर कळस गाठला आहे. सेन्सॉर बोर्डाचं हे असं वागणं तसं पाहिलं तर नवीन नाही. याआधीही नारायण सुर्वेंच्या कवितांवर आक्षेप घेत एका नाटकाला परवानगी नाकारण्याचं पातक सेन्सॉर बोर्डाने केलं होतंच की...! या संवेदनाशून्य सेन्सॉर बोर्डाचे डोंगर हलवायला ढसाळांचीच कविता हवी, असं गटणे मास्तरांना मनोमन वाटलं.
ज्यांना ‘पद्मश्री’ देत केंद्र सरकारने गौरविले, साहित्य अकादमीनेही ज्यांना जीवनगौरव देत त्यांच्या लेखनाची प्रशस्ती केली, ते नामदेव ढसाळ सेन्सॉर बोर्डाला माहिती नसावेत? हा कसला विरोधाभास? ढसाळांसारख्या प्रतिभावान कवीचं हे सोयिस्कर विस्मरण म्हणजे आपल्या सांस्कृतिक व्यवस्थेचाच मोठा दोष आहे. त्यामुळेच ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो...’ अशी नव्या क्रांतीची साद पुन्हा घातली पाहिजे, असं वाटून गटणे मास्तर हताशपणे ढसाळांच्याच ओळींचा आधार घेत उद्गारले, ‘मी जगण्याचे ओझे येथपर्यंत वाहत आणले हे जगण्याच्या वास्तवा आता तूच सांग मी काय लिहू?’