नालेसफाईच्या कामात कुचराई!

By Admin | Updated: May 28, 2014 01:18 IST2014-05-28T01:18:48+5:302014-05-28T01:18:48+5:30

शहर आणि पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामाने वेग धरला असतानाच पूर्व उपनगरातील नालेसफाईही ७५ टक्के झाल्याचा दावा महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी केला आहे

Nalsfai's work crushed! | नालेसफाईच्या कामात कुचराई!

नालेसफाईच्या कामात कुचराई!

समीर कर्णुक, मनीषा म्हात्रे, मुंबई - शहर आणि पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामाने वेग धरला असतानाच पूर्व उपनगरातील नालेसफाईही ७५ टक्के झाल्याचा दावा महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी केला आहे. प्रत्यक्षात मात्र येथील मोठ्या नाल्यांतील गाळ उचलण्यात आला नसून, छोट्या नाल्यांची अवस्था तर दयनीय झाली आहे. परिणामी ऐन पावसाळ्यात पाणी तुंंबून परिसर जलमय होण्याची भीती व्यक्त होत असून, नागरिकांना दुहेरी मनस्ताप होणार आहे. महापालिका आयुक्त सीताराम कुंटे आणि महापौर सुनील प्रभू यांनी शहर आणि उपनगरातील नालेसफाईच्या पाहणीवर जोर दिला आहे. मागील आठवड्यात कुंटे यांनी पूर्व उपनगरातील नाल्यांची पाहणी करत येथे ७५ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात मात्र येथील नाल्यांवर नजर टाकली असता चित्र वेगळेच आहे. पूर्व उपनगरातील कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगर येथील मिठी नदीची साफसफाई करण्यासह येथील गाळ काढण्यासाठी एप्रिल महिन्यात यंत्रणा मिठीत उतरविण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून येथे एकदाही मिठीतला गाळ काढतानाचे चित्र निदर्शनास आले नाही. परिणामी क्रांतीनगर एअरपोर्ट पुलापासून कलिनापर्यंतची मिठी नदी गाळातच रुतल्याचे चित्र आहे. तेच चित्र चकाला येथे आहे. येथेही काठावर संरक्षक भिंत बांधली असून, नदी गाळाने भरली आहे. मुलुंड ते घाटकोपरदरम्यान रेल्वे रुळाखालून जाणार्‍या नाल्यांंची सफाई अपूर्ण आहे. भांडुप स्टेशन परिसरातही नाल्यामुळे स्टेशन मास्तर कार्यालयात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. आणि या वर्षीही हीच परिस्थिती कायम राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

Web Title: Nalsfai's work crushed!