नालेसफाईचे व्हिडीओ शूटिंग
By Admin | Updated: May 20, 2015 00:44 IST2015-05-20T00:44:14+5:302015-05-20T00:44:14+5:30
मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामात कोणतीही हलगर्जी होऊ नये यासाठी पालिकेने सफाईचे व्हिडीओ शूटिंग करण्यास सुरुवात केली आहे.

नालेसफाईचे व्हिडीओ शूटिंग
पनवेल : पनवेल नगरपालिका हद्दीत पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामात कोणतीही हलगर्जी होऊ नये यासाठी पालिकेने सफाईचे व्हिडीओ शूटिंग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कामात अधिक पारदर्शकता येईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
‘अ’ वर्ग नगरपालिका असलेल्या पनवेल शहराची हद्द ५० किमी अंतराची आहे. शहरातील बावन बंगला, साईनगर, कोळीवाडा, पट्टेल, कच्छी मोहल्ला, मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी, कोळीवाडा, तक्का, ठाणा नाका, कफ नगर, खांदा गाव या भागांत पूर्वी वाडे व जुनी घरे होती. त्याची जागा आता टोलेजंग इमारतींनी घेतली असून लोकवस्तीत भर पडली आहे. पनवेलचा चेहरा-मोहरा बदलत चालला असताना काही बदल या भागात झाले, त्याचा परिणाम आपत्ती व्यवस्थापनावर झाला. शहराचा काही भाग सखल असल्याने तिथे पावसाळ्यात पाणी साचून जनजीवन विस्कळीत होते. याचा फटका २६ जुलै २००५ला बसला. मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. त्यातून बोध घेऊन पालिकेने काही ठिकाणी खास पावसाळी गटारे तयार केली आहेत. जवळपास १७ ते १८ किमीचे पावसाळी नाले असून त्यातून पावसाच्या पाण्याचा निचरा होतो. एनएचबीला करण्यात आलेल्या भरावामुळे पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहात अडथळा येतो. त्याचबरोबर सिडकोने चिंचपाड्यातही भराव केला आहे. त्याचा परिणाम पनवेलवर होणार असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे.
या पार्श्वभूमीवर पनवेल नगरपालिकेने खबरदारी घेतली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. याकरिता खाजगी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. सफाईकरिता वेगवेगळ्या टीम करण्यात आल्या असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. अतिरिक्त मुख्याधिकारी चारूशीला पंडित यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक दिलीप कदम, दौलत शिंदे, शैलेश गायकवाड, संगीता अंबोलकर यांचे सर्व कामावर लक्ष असून त्यामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नये याकरिता प्रशासनाने खास खबरदारी घेतली आहे. या कामांवर लक्ष ठेवण्याबरोबर आॅडिट करण्याकरिता व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
ठेकेदारांवर वचक
च्वरवरचा गाळ काढून ठेकेदार बिल काढण्यासाठी मोकळे होतात. मात्र त्यामुळे नालेसफाई व्यवस्थित होत नाही. परिणामी पावसाळ्यात नाले तुंबणे, ठिकठिकाणी पाणी साचणे असे प्रकार घडतात. या सर्व गोष्टींचा विचार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामाचे व्हिडीओ शूटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने यासाठी खास कॅमेरामन नियुक्त केला आहे. कॅमेऱ्याचा दर्जा चांगला ठेवण्यात आला आहे. नाल्याची सफाई करण्यापूर्वी आणि केल्यानंतर असे दोनदा चित्रीकरण करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुरावे मिळणार
च्नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात बाधित होणाऱ्यांच्या पुनर्वसनाकरिता गाढी नदीच्या बाजूला सिडकोने मोठा भराव केला आहे. त्यामुळे पनवेल नैसर्गिकदृष्ट्या त्याच जागेवर राहिले असून दुसरा भाग उंचावला आहे. परिणामी पावसाच्या पाण्याला अडथळा निर्माण होऊन शहरात पाणी साचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यावेळी पालिकेने नालेसफाई व्यवस्थित न केल्याने ही परिस्थिती उद्भवली, असा कांगावा सिडको करू शकते म्हणून पुरावा राहावा, या उद्देशाने शूटिंगचा फायदा होईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.