मानखुर्द-शिवाजी नगरात नालेसफाईला मुहूर्त नाही
By Admin | Updated: June 4, 2015 05:18 IST2015-06-04T05:18:41+5:302015-06-04T05:18:41+5:30
नालेसफाईची मुदत संपली असताना मानखुर्द-शिवाजी नगर परिसरातील अनेक नाल्यांची सफाई पालिकेकडून अद्याप झालेलीच नाही

मानखुर्द-शिवाजी नगरात नालेसफाईला मुहूर्त नाही
मुंबई : नालेसफाईची मुदत संपली असताना मानखुर्द-शिवाजी नगर परिसरातील अनेक नाल्यांची सफाई पालिकेकडून अद्याप झालेलीच नाही. त्यामुळे या वर्षी पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबण्याची शक्यता असल्याने रहिवाशांमध्ये संतापाची भावना आहे.
दरवर्षांप्रमाणे पालिकेने या वर्षी काही भागांत नालेसफाईला लवकरच सुरुवात केली. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याअगोदरच पालिका सर्व नाले साफ करेल, असा विश्वास रहिवाशांना वाटत होता. मात्र पावसाळा तोंडावर आला असताना अद्यापही येथील अनेक नाल्यांची सफाई सुरू आहे. तर काही ठिकाणी नालेसफाईला सुरुवातच झालेली नाही. मानखुर्द- शिवाजी नगर परिसरातदेखील अशीच स्थिती असून येथील साठे नगर नाला आणि मंडाळा नाला या मुख्य नाल्यांची काही ठिकाणी पालिकेने सफाईच केलेली नाही. त्यामुळे या नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला आहे. त्यातच पावसाचे आगमनदेखील काही दिवसांतच होणार असल्याने २६ जुलै २००५ सारखा पाऊस झाल्यास हे नाले पूर्णपणे तुंबण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याच परिसरातील काही नाल्यांची पालिकेने वेळेआधीच साफसफाई केली. मात्र सफाईनंतर काढलेला गाळ कंत्राटदाराने नाल्याच्या कडेला काढून ठेवला आहे. नियमांप्रमाणे नाल्यांतून काढलेला ओला गाळ सुकल्यावर तो उचलला जातो. मात्र येथील गाळ काढून दोन आठवडे लोटले तरी कंत्राटदाराने तो उचललेला नाही. परिणामी तो सुकून रस्त्यावर आला आहे आणि येथे धुळीचे साम्राज्य आहे. यातच पाऊस आला तर हा सर्व गाळ पुन्हा नाल्यांमध्ये उतरणार आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी येथील रहिवासी करतात. (प्रतिनिधी)