मुंबई : दातांवरील उपचारांत लोकल ॲनेस्थेशियाचा वापर केला जातो. मात्र, विशेष मुले उपचारांमध्ये सहकार्य करत नाहीत. त्यांच्यावर महापालिकेच्या नायर डेंटल हॉस्पिटलमध्ये जनरल ॲनेस्थेशिया देऊन मोफत उपचार केले जातात. अशा पद्धतीचे उपचार करणारे नायर हे देशातील एकमेव हॉस्पिटल आहे.
येथे दरवर्षी २०० विशेष मुलांवर उपचार केले जातात. विशेष मुलांमध्ये डाउन सिंड्रोम, सेरेब्रल पाल्सी, स्वमग्नता यांचा समावेश असतो. अशा मुलांच्या दातांची काळजी घेणे पालकांसाठी आव्हानात्मक असते. विशेष मुले दातांच्या उपचारांमध्ये सहकार्य करतील याची शाश्वती नसते. त्यामुळे अशा मुलांवर संपूर्ण शरीराला भूल देऊन त्यानंतर उपचार केले जातात.
नायरमध्ये तीन अद्ययावत ऑपरेशन थिएटर आणि २६ बेड्सचा वॉर्ड त्यासोबत सहा खासगी खोल्या आहेत. उपचारांच्या अगोदर आणि उपचारणानंतर या रुग्णांना या वॉर्ड्समध्ये उपचार दिले जातात.
विशेष मुलांवरील उपचारासाठी आमच्याकडे नायर मेडिकल कॉलेजचे ॲनेस्थेशिया विभागाचे डॉक्टर नियुक्त आहेत. विशेष मुलांना जनरल ॲनेस्थेशिया देण्याआधी फिटनेससाठी सर्व चाचण्या केल्या जातात. त्यानंतर त्यांना दंत उपचारासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये घेतले जातात. उपचार केल्यानंतरही रुग्णाला वॉर्डमध्ये दोन दिवसांसाठी ठेवले जाते. अशा पद्धतीची सुविधा अन्य कोणत्याही दंत रुग्णालयात उपलब्ध नाही. - डॉ. नीलिमा अंड्राडे, अधिष्ठाता नायर रुग्णालय