बाळगंगा धरणाच्या पाण्यावर ‘नैना’ची मदार

By Admin | Updated: November 25, 2015 02:10 IST2015-11-25T02:10:50+5:302015-11-25T02:10:50+5:30

मुंबईपेक्षा दुप्पट क्षेत्रफळ असलेल्या नैना प्रकल्पासाठी सिडकोने कंबर कसली आहे. भविष्यात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वसाहती निर्माण होणार आहेत.

Naina's heart on the water of Barganga dam | बाळगंगा धरणाच्या पाण्यावर ‘नैना’ची मदार

बाळगंगा धरणाच्या पाण्यावर ‘नैना’ची मदार

कमलाकर कांबळे ,  नवी मुंबई
मुंबईपेक्षा दुप्पट क्षेत्रफळ असलेल्या नैना प्रकल्पासाठी सिडकोने कंबर कसली आहे. भविष्यात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वसाहती निर्माण होणार आहेत. या वसाहतींना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी सिडकोची असणार आहे. त्यासाठी रायगड जिल्ह्यातील पेणजवळील बाळगंगा धरणाकडे पर्याय म्हणून पाहिले जाते. मात्र मागील काही वर्षांपासून या धरणाचे काम रखडले आहे. ते पुन्हा सुरू व्हावे, या दृष्टीने सिडकोने पाठपुरावा सुरू केला आहे.
विमानतळ प्रभावित क्षेत्रात मोडणाऱ्या ठाणे, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण आणि उरण या तालुक्यातील २५ किलोमीटर क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून शासनाने सिडकोची नियुक्ती केली आहे. त्यानुसार सिडकोने या क्षेत्राचा विकास प्रस्ताव आणि विकास नियंत्रण नियमावली तयार करून मान्यतेसाठी ती शासनाकडे पाठविली आहे. नैना क्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ ६00 चौरस किमी इतके आहे. या संपूर्ण क्षेत्राचा दोन टप्प्यात विकास करण्यात येणार आहे. यातील पहिल्या टप्प्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पनवेल तालुक्यातील २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांच्या विकासासाठी पथदर्शी (पायलट प्रोजेक्ट) प्रोजेक्ट राबविण्याची सिडकोची योजना आहे. त्यानुसार ३७ चौरस किमी क्षेत्रफळाचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर त्यावर सूचना व हरकती मागवून त्यांचा अंतिम मसुदा मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळताच नैनाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे. पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी किमान सात वर्षांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सिडको नैना क्षेत्रात घरे बांधणार नाही. फक्त पायाभूत सुविधांची निर्मिती करणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे नियोजनसुध्दा सिडकोलाच करावे लागणार आहे. त्यानुसार सिडकोने चाचपणी सुरू केली आहे.
पेण तालुक्यातील बाळगंगा नदीवर कोकण पाटबंधारे विभागातर्फे बाळगंगा धरण बांधण्यात येत आहे. या धरणाची क्षमता ३५0 दशलक्ष लिटर इतकी आहे. परंतु धरणाच्या कामात झालेल्या कथित भ्रष्टाचारामुळे लाचलुचपत विभागाने कंत्राटदारासह अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे सध्या या धरणाचे काम बंद पडले आहे. असे असले तरी दुसरा कंत्राटदार नेमून रखडलेले धरणाचे काम तातडीने पूर्ण करावे, यासाठी सिडकोचा पाठपुरावा सुरू आहे. इतकेच नव्हे, तर शासनाच्या सूचनेनुसार धरणाच्या कामासाठी सिडकोने पाटबंधारे विभागाला ४५0 कोटी रूपये अग्रीम रक्कमही दिली आहे. हे धरण पूर्ण झाल्यास नैना सिटीसह सिडको कार्यक्षेत्रातील अन्य वसाहतींच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.

Web Title: Naina's heart on the water of Barganga dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.