पनवेल शहराला ‘नैना’चा बुस्टर

By Admin | Updated: October 6, 2015 00:52 IST2015-10-06T00:52:56+5:302015-10-06T00:52:56+5:30

सिडकोच्या माध्यमातून येवू घातलेल्या विविध प्रकल्पांमुळे पुढील दशकभरात पनवेल शहराला ग्लोबल स्वरूप प्राप्त होणार हे निश्चित आहे. सिडकोच्या प्रस्तावित ‘नैना’ प्रकल्पामुळे

'Naina' booster to Panvel city | पनवेल शहराला ‘नैना’चा बुस्टर

पनवेल शहराला ‘नैना’चा बुस्टर

- कमलाकर कांबळे, नवी मुंबई
सिडकोच्या माध्यमातून येवू घातलेल्या विविध प्रकल्पांमुळे पुढील दशकभरात पनवेल शहराला ग्लोबल स्वरूप प्राप्त होणार हे निश्चित आहे. सिडकोच्या प्रस्तावित ‘नैना’ प्रकल्पामुळे पनवेल आणि परिसराला बुस्टर ठरणार आहे. ‘नैना’च्या माध्यमातून केवळ पनवेलच नव्हे, तर ठाणे, कर्जत आणि उरण तालुक्यातील २७0 गावांना आधुनिक विकासाचा स्पर्श होणार आहे. विमानतळ उभारणीचा मार्ग मोकळा झाल्याने बांधकाम उद्योगांवरील मंदीचे सावट दूर झाल्याचे चित्र आहे.

विमानतळ प्रभावित क्षेत्रात मोडणाऱ्या ठाणे, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण आणि उरण या तालुक्यातील २५ किलोमीटर क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून शासनाने सिडकोची नियुक्ती केली आहे. त्यानुसार सिडकोने या क्षेत्राचा विकास प्रस्ताव आणि विकास नियंत्रण नियमावली तयार करून मान्यतेसाठी ती शासनाकडे पाठविली आहे. ‘नैना’ क्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ ६00 चौरस किमी इतके आहे. या संपूर्ण क्षेत्राचा दोन टप्प्यात विकास करण्यात येणार आहे. यातील पहिल्या टप्प्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पनवेल तालुक्यातील २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांच्या विकासासाठी पथदर्शी (पायलट प्रोजेक्ट ) प्रोजेक्ट राबविण्याची सिडकोची योजना आहे. त्यानुसार ३७ चौरस किमी क्षेत्रफळाचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर त्यावर सूचना व हरकती मागवून त्यांचा अंतिम मसुदा मान्यतेसाठी गेल्या महिन्यात शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळताच नैनाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे. पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी दहा वर्षांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सिडको नैना क्षेत्रात घरे बांधणार नाही. फक्त पायाभूत सुविधांची निर्मिती करणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचया मार्गातील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. सन २0१९ मध्ये या विमानतळावरून पहिले विमान उड्डाण घेईल, असा अशावाद सिडकोने व्यक्त केला आहे. त्यानुसार विमानतळ उभारणीच्या कामाला गती देण्यात आली आहे. ही बाब विकासकांच्या चांगलीच पथ्यावर पडली आहे. प्रस्तावित विमानतळामुळे या परिसरात उद्योगधंदे वाढतील. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा आणि दळणवळणाचे जाळे विणले जाईल. त्यामुळे निश्चितच या परिसरातील घरांना चांगली मागणी येईल, असा विकासकांचा व्होरा होता. त्यानुसार अनेक बिल्डर्स आणि गुंतवणूकदारांनी विमानतळ परिसरात मोठमोठ्या जमिनी खरेदी करून ठेवल्या आहेत. विमानतळाचे काम मार्गी लागल्याने या जमिनींवर मोठमोठे गृहसंकुल उभारले जात आहेत. एकूणच नैना प्रकल्पामुळे पनवेल व त्याच्या परिसराच्या शहरीकरणाला वेग येणार आहे.

बिल्डर्सच्या कार्यालयांची बजबजपुरी
पनवेलच्या दहा किलोमीटरच्या परिघात विकासकामांना मोठ्याप्रमाणात वाव असल्याने तसेच या परिसरातील घरांना चांगली मागणी मिळत असल्याने या भागात सध्या लहान-मोठ्या विकासक कंपन्यांच्या कार्यालयाची बजबजपुरी झाली आहे. विशेषत: नवीन पनवेल स्थानकाच्या परिसरात आजमितीस बिल्डर्सचे शंभर ते दीडशे कार्यालये आहेत. यात अनेक नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. मोठमोठे टाउनशिप प्रस्तावित करण्यात आले आहे. हे सर्व प्रकल्प पनवेलच्या चौफेर परिसरातच उभारले जात असल्याने येत्या काळात पनवेल शहर विकासाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

स्वस्त घरांचे डेस्टिनेशन
स्वस्त व बजेटमधील घरांचे डेस्टिनेशन म्हणून नैना क्षेत्राकडे पाहिले जाते. या परिसरातील गृहप्रकल्पातील घरांच्या किमती प्रति चौरस फूट तीन ते साडेतीन हजार इतक्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नोकरदारांना ही घरे परवडणारी आहेत. गृहकर्जाच्या सुविधाही सुलभ असल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील चाकरमान्यांकडून येथील घरांना पसंती मिळत आहेत. मागील चार पाच वर्षात मालमत्तेच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे घर खरेदीची प्रक्रिया मंदावली होती. मात्र विमानतळ उभारणीचा मार्ग मोकळा झाल्याने वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत असलेले ग्राहक घर खरेदीसाठी बाहेर पडू लागला आहे.

समूह विकासासाठी प्रयत्न
नैना प्रकल्पातील भूधारकांनी समूह शहर विकासासाठी पुढाकार घ्यावा यासाठी सिडकोचे प्रयत्न सुरू आहेत. गुजरातच्या धर्तीवर ६0 हजार हेक्टर क्षेत्रफळाच्या जागेवर शेतकऱ्यांनी छोटी-मोठ्या शहरांचा विकास करावा, यासाठी सिडको आग्रही आहे. त्यासाठी सिडकोने नैना स्कीम तयार केली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी किमान १0 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. त्यातील ४0 टक्के जमीन सिडकोला विनामूल्य हस्तांतरित करावी लागणार आहे. बदल्यात संबंधित भूधारकांना उरलेल्या ६0 टक्के जमिनीवर १.७ एफएसआय मिळणार आहे. तसेच हस्तांतरित होणाऱ्या ४0 टक्के जमिनीतून सिडको रस्ते, मोकळी मैदाने, उद्याने व इतर सुविधा उपलब्ध करणार आहे.

दळणवळणाचे जाळे
प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर या परिसरात दळणवळणाचे जाळे विणले जात आहे. बेलापूर ते पेंधरपर्यंतचा सिडकोच्या मेट्रो प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच शिवडी-न्हावाशेवा व पुढे चिर्लेपर्यंतच्या २२ किलोमीटर लांबीच्या सागरी सेतूच्या प्रकल्पाचे कामही आता जवळजवळ मार्गी लागले आहे. कर्जत ते पनवेलपर्यंतच्या प्रवासी लोकलला हिरवा कंदील मिळाला आहे. तर उरण ते पनवेल रेल्वे मार्गाची सिडकोने चाचपणी सुरू केली आहे. अशाप्रकारे या परिसरात दळवळणाची उत्तम साधणे निर्माण होत आहेत. त्यामुळे भविष्यात या परिसरातील बांधकाम उद्योगाला आणखी चालना मिळण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Web Title: 'Naina' booster to Panvel city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.