Join us  

नाईकांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2019 6:19 AM

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ सप्टेंबरला नवी मुंबईत सोहळा

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशावरून उलटसुटल चर्चा सुरू आहेत. त्यांचे पुत्र संदीप नाईक यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन यापूर्वीच भाजपात प्रवेश केला आहे; परंतु गणेश नाईक आणि त्यांचे ज्येष्ठ पुत्र माजी खासदार संजीव नाईक हे भाजपात कधी प्रवेश करणार याबाबत तर्क-वितर्क लढविले जात होते. अखेर या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून, ९ सप्टेंबर रोजी नाईक यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादीच्या ५२ नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या पक्षांतराबाबतच्या आग्रहाचा हवाला देत पहिल्या टप्प्यात संदीप नाईक यांनी आमदारकीचा राजीनामा देत माजी महापौर सागर नाईक यांच्यासह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. पण गणेश नाईक व त्यांचे ज्येष्ठ पुत्र संजीव नाईक यांनी भाजपप्रवेशाबाबत मौन बाळगल्याने कार्यकर्त्यांत चलबिचल सुरू झाली होती. यातच शनिवारी नेरुळ येथील कार्यकर्ता मेळाव्याला आलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे भाजपच्या वाटेवर असलेल्या संजीव नाईक यांनी सपत्नीक स्वागत केले. कार्यक्रमानंतर तासभर त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे संजीव नाईक राष्ट्रवादीतच राहणार अशा आशयाच्या चर्चेला उधाण आले; परंतु आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.गणेश नाईक हे आपले ज्येष्ठ चिरंजीव संजीव नाईक यांच्यासह राष्ट्रवादीचे महापालिकेतील नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासमवेत एका भव्य सोहळ्यातून ९ सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करतील, असे बोलले जात आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याप्रसंगी नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचेअनेक नगरसेवक व पदाधिकारी नाईक यांच्यासमवेत भाजपमध्ये प्रवेश करतील, असेही सांगण्यात येत आहे. मात्र, या वृत्ताला नाईक यांच्या गोटातून अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसनवी मुंबईगणेश नाईक