नाईक परिवाराची सुरक्षा काढली
By Admin | Updated: December 22, 2015 00:43 IST2015-12-22T00:43:07+5:302015-12-22T00:43:07+5:30
शहरातील १२ महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा व्यवस्था पोलिसांनी काढून घेतली आहे. त्यामध्ये माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक व ज्ञानेश्वर नाईक यांचाही समावेश आहे

नाईक परिवाराची सुरक्षा काढली
नवी मुंबई : शहरातील १२ महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा व्यवस्था पोलिसांनी काढून घेतली आहे. त्यामध्ये माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक व ज्ञानेश्वर नाईक यांचाही समावेश आहे. सद्य:स्थितीमध्ये जीवाला धोका नसल्याचा अहवाल सुरक्षा समितीने दिल्यामुळे ही कार्यवाही केली आहे.
नवी मुंबईमध्ये महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये गणेश नाईक व त्यांच्या परिवारातील सदस्यांचा समावेश होतो. १९९५ पासून जवळपास १५ वर्षे स्वत: नाईकसाहेब कॅबिनेट मंत्री आहेत. याच दरम्यान संजीव नाईक यांनी महापौर व खासदार म्हणून काम केले आहे. संदीप नाईक सद्य:स्थितीमध्ये आमदार आहेत. सागर नाईक पाच वर्षे महापौर, तर त्यांचे वडील ज्ञानेश्वर नाईक पाच वर्षे नगरसेवक होते. या सर्वांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. नाईक परिवारातील कोणतीही व्यक्ती सार्वजनीक कार्यक्रमास गेल्यानंतर त्यांच्यासोबत शस्त्रधारी पोलीस तैनात असल्याचे चित्र शहरवासीयांना वर्षानुवर्षे दिसत होते. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराचा वापर करून ही याविषयी माहिती मागविली होती. जीवाला धोका असल्यामुळे त्यांना सुरक्षा पुरविण्यात आल्याचे त्या वेळी स्पष्ट केले होते. परंतु मागील एक वर्षात केंद्र व राज्यात सत्तापरिवर्तन झाले आहे. संजीव नाईक यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये स्वत: गणेश नाईक यांचा पराभव झाला. ज्ञानेश्वर नाईक व सागर नाईकही कोणत्याच वैधानिक पदावर कार्यरत नाहीत. पोलीस आयुक्तालयामधील सुरक्षा समितीच्या अहवालामध्ये शहरातील एकूण १२ जणांना सुरक्षेची सद्य:स्थितीमध्ये गरज नसल्याचे स्पष्ट केले असल्यामुळे या तिघांचीही सुरक्षा काढून घेतली आहे. दोन दशकांमध्ये पहिल्यांदाच असे घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
माजी खासदार व महापौरांसह भाजपाचे पदाधिकारी वैभव नाईक, महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचे चिरंजीव नगरसेवक ममीत चौगुले व इतर ७ जणांचीही सुरक्षा काढली आहे. ज्यांच्या जीवाला धोका आहे अशा नगरसेवक, व्यावसायिक व इतरांना त्यांच्या जीवाला धोका असल्यास मागणी केल्यानंतर सुरक्षा पुरविली जाते. पोलिसांची सुरक्षा समिती खरोखर संबंधितांना गरज आहे का, याची शहानिशा करून सुरक्षा देत असते. (प्रतिनिधी)