Join us  

नाईक प्रकरण फडणवीस यांनी दाबले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 5:43 AM

भास्कर जाधव यांचा हल्लाबोल; चौकशी करू : गृहमंत्री देशमुख

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अलिबागमधील इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने आत्महत्या केली होती. त्या बाबत त्यांच्या पत्नी व मुलीने तक्रार केलेली असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते प्रकरण दाबून ठेवले, त्याची चौकशी करा अशी मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव यांनी मंगळवारी विधानसभेत केली. फडणवीस यांनी ते प्रकरण दाबल्याची चौकशी करायची आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी फडणवीस हे सरकारवर विधानसभेत तोफ डागत असतानाच जाधव यांनी त्यांचा हल्ला परतविण्यासाठी अन्वय नाईक प्रकरणात फडणवीस यांच्यावर थेट आरोप केला. या प्रकरणात पत्रकार अर्णब गोस्वामी आरोपी आहे, त्यामुळे ते प्रकरण फडणवीस यांच्याकडून दाबले गेले. या प्रकरणाची चौकशी पोलीस अधिकारी सचिन वाझे करीत असल्यानेच आता वाझेंना मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात गोवले जात आहे. वाझेंना आहे तिथेच ठेवा. अन्वय नाईक प्रकरणात आणखी तपास झाला तर तुम्हाला बेड्या पडतील, फडणवीस अडचणीत येतील, असे जाधव म्हणाले. जस्टिस लोया यांचा नागपुरात मृत्यू कसा झाला हेही फडणवीस यांनी सांगावे, असेही ते म्हणाले.

खुशाल चौकशी करा, आम्ही घाबरत नाही - फडणवीसतुमच्या धमक्यांना मी घाबरत नाही, करा; तुम्ही माझी चौकशी कराच. कर नाही तर डर कशाला अशा शब्दांत फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आव्हान दिले. माझं खुलं आव्हान आहे, चौकशी करूनच दाखवा असे त्यांनी सुनावले. त्यावर, ‘केंद्रात यांचे सरकार असल्याने त्या बळावर हे अशी आव्हानाची भाषा करीत आहेत’ असे भास्कर जाधव म्हणाले.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभास्कर जाधव