Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्णब गोस्वामींसाठी फडणवीसांची वकिली, हायकोर्टाला कळकळीची विनंती

By महेश गलांडे | Updated: November 9, 2020 15:53 IST

अलिबागमधील वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आईने केलेल्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी अटक झाली असून त्यांना स्थानिक कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

ठळक मुद्देअलिबागमधील वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आईने केलेल्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी अटक झाली असून त्यांना स्थानिक कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मुंबई - अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचे नेते सध्या आमने-सामने आले आहेत. अर्णब गोस्वामींना झालेल्या अटकेवरून भाजपाकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीवर सातत्याने टीका सुरू आहे. त्यातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयाकडेच याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. 

अलिबागमधील वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आईने केलेल्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी अटक झाली असून त्यांना स्थानिक कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याविरोधात गोस्वामी यांनी हायकोर्टात धाव घेतली असून आज मुबई हायकोर्टाने अर्णब यांचा अंतरिम जामिनाचा अर्ज फेटाळला आहे. त्यांना सत्र न्यायालयात जाण्याचे हायकोर्टाने सुचवले आहे. आता, याप्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन उच्च न्यायालयाकडे विनंती केली आहे. याप्रकरणी सुमोटो दाखल करुन माहिती घेण्याची विनंती फडणवीस यांनी केली आहे.  अन्वय नाईक आत्मत्याप्रकरणात अटकेत असलेल्या अर्णब गोस्वामींबाबत माननीय उच्च न्यायालयाने सुमोटो दाखल करावी, अशी विनंती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेपासून ते आजपर्यंत राज्य सरकारने गोस्वामी यांना योग्य वागणूक दिली नसल्याचा आरोप गोस्वामी यांनी केला आहे. त्यामुळे, यासंदर्भात उच्च न्यायालयाने सुमोटो दाखल करुन माहिती घ्यावी, अशी विनंती फडणवीस यांनी उच्च न्यायालयाकडे केली आहे.

राज्यपालांचा गृहमंत्र्यांना फोन

सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी भगतसिंह कोश्यारी यांनी अर्णब गोस्वामींच्या सुरक्षा व आरोग्याबाबत आपली चिंता व्यक्त केली. तसेच, अर्णब गोस्वामींच्या कुटुंबीयांना त्यांना भेटू देण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची परवानगी द्यावी, अशीही सूचना भगतसिंह कोश्यारी यांनी अनिल देशमुख यांना केली आहे. दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांनी यापूर्वी अनिल देशमुख यांच्याकडे अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या पद्धतीवरून चिंता व्यक्त केली होती. 

अर्णब गोस्वामी यांची तळोजा कारागृहात रवानगी

अर्णब गोस्वामींच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली असतानाच त्यांची रवानगी तळोजा येथील कारागृहात करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार अर्णब गोस्वामी यांची रविवारी अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहातून तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसअर्णब गोस्वामीउच्च न्यायालयगुन्हेगारी