‘एन’ वॉर्डचा लेखाजोखा: चकाचक तरी कोंडी, पार्किंगने महापौर वॉर्ड बेजार
By जयंत होवाळ | Updated: March 9, 2026 12:57 IST2026-03-09T12:56:49+5:302026-03-09T12:57:13+5:30
महापौर रीतू तावडे यांचा घाटकोपर पूर्व प्रभाग हा मुंबईच्या ईशान्य उपनगरातील दाट लोकवस्तीचा आणि वेगाने विकसित होणारा भाग आहे.

‘एन’ वॉर्डचा लेखाजोखा: चकाचक तरी कोंडी, पार्किंगने महापौर वॉर्ड बेजार
जयंत होवाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नगरसेवकांच्या निवडणुकीमुळे आता रखडलेली कामे मार्गी लागावी, समस्या सुटाव्यात, अशा अपेक्षा नागरिक करताहेत. लोकप्रतिनिधी म्हणून महापौर, उपमहापौर, गटनेते यांना आपल्या पदाची जबाबदारी निभावतानाच मुंबईकरांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, ते सोडवणे हे कर्तव्यही पार पाडावे लागेल. अवाढव्य मुंबईकडे लक्ष पुरवतानाच त्यांना स्वतःच्या प्रभागातील समस्यांकडेही बघावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर, त्यांच्या प्रभागात नेमक्या कोणत्या समस्या आहेत? त्यांची सोडवणूक ते कशी करणार? याचा आढावा आपण या मालिकेतून घेणार आहोत. सुरुवात महापौरांच्या प्रभागापासून...
मुंबई : महापौर रीतू तावडे यांचा घाटकोपर पूर्व प्रभाग हा मुंबईच्या ईशान्य उपनगरातील दाट लोकवस्तीचा आणि वेगाने विकसित होणारा भाग आहे. या प्रभागाचा दौरा केला असता स्वच्छता आणि पाणीपुरवठ्याच्या बाबतीत कोणत्याही तक्रारी नसल्याचे दिसले. मात्र, पार्किंग समस्या आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त जाणवले.
प्रभागाचा लेखाजोखा
९०% इमारती
१०% झोपडपट्टी
प्रभाग क्रमांक : १३२ (घाटकोपर पूर्व)
भागाचे नाव : ‘एन’ वॉर्ड
विधानसभा मतदारसंघ : घाटकोपर पूर्व
लोकसभा मतदारसंघ : उत्तर-पूर्व मुंबई
प्रभागाची लोकसंख्या : सुमारे २ लाख
प्रभागात सध्या सुरू प्रकल्प
वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो ४
प्रभागाचे भौगोलिक क्षेत्र
प्रमुख रस्ते : लालबहादूर शास्त्री मार्ग, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे
महत्त्वाचे भाग : गरोडिया नगर, राजावाडी परिसर
शैक्षणिक संस्था : गरोडिया इंटरनॅशनल स्कूल, पुणे विद्याभवन, गुरुकुल
महत्त्वाची धार्मिक / सामाजिक स्थळे : सिद्धिविनायक मंदिर (पंतनगर), जैन मंदिर (गरोडिया नगर)
रुग्णालये : राजावाडी पालिका रुग्णालय
उद्याने : ९
प्रभागात कोणकोणत्या आहेत प्रमुख समस्या?
वाहतूककोंडी : घाटकोपर रेल्वे स्टेशन परिसर, पंतनगर, एलबीएस मार्ग आणि घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ही रोजचीच बाब झाली आहे.
पार्किंग समस्या : गरोडिया नगर आणि बाजारपेठ परिसरात पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होणे हेदेखील नित्याची डोकेदुखी आहे.
रस्त्यांची अवस्था : काही रस्ते खासगी मालमत्तेच्या अखत्यारीतील असल्यामुळे रस्त्यांचा विकास करताना महापालिकेवर मर्यादा येतात. प्रभागात अरुंद गल्ल्या आणि चिंचोळे रस्ते असल्यामुळे वाहतुकीवर ताण येतो.
अतिक्रमण : पदपथांवर खाऊ गल्ल्यांचे मोठ्या संख्येने अतिक्रमण झाले आहे. यामुळे पादचाऱ्यांना चालायला जागा नाही.
आरोग्य व्यवस्था : महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयावर रुग्णांचा ताण सातत्याने वाढत आहे. या रुग्णालयात सुविधा वाढविण्याची गरज आहे.
स्थानिक काय म्हणतात?
"अतिक्रमण करणाऱ्या काही स्टॉलचा प्रश्न हळूहळू डोके वर करू लागला आहे. अनधिकृत फेरीवाल्यांना वेळीच आवर घातला पाहिजे, वाहतुकीची समस्या सोडवली पाहिजे. या काही समस्या सोडल्या तर आमचा वॉर्ड छान आहे."
- डॉ. विपुला जोशी, उपाध्यक्ष, गरोडिया फेडरेशन
"वाहतूककोंडी आणि पार्किंग या घाटकोपरला भेडसावणाऱ्या दोन महत्त्वाच्या समस्या आहेत. घाटकोपरला अनेक ठिकाणी कनेक्टिव्हिटी असल्यामुळे येथे अंतर्गत आणि बाहेरील वाहनांचा प्रचंड राबता असतो. वाहन कुठे पार्क करायचे, असा प्रश्न रोज पडतो."
- मकरंद शिंदे, स्थानिक नागरिक
लोकप्रतिनिधी आणि प्रशासन काय म्हणतात?
"वाहतूककोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांशी बोलून मार्ग काढला जाईल. खासगी आराखड्यातील रस्त्यांच्या बाबतीत आयुक्तांशी बोलून धोरण ठरवण्यात येईल. उद्याने आणखी अद्ययावत आणि नागरिकांच्या सोयीची कशी होतील, या दृष्टीने सुधारणा केल्या जातील."
- रीतू तावडे, महापौर व नगरसेविका
"रस्ते चिंचोळे असल्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न आहे. तो दूर करण्यासाठी वाहतूक विभागाशी चर्चा सुरू आहे. खासगी मालमत्तेच्या अखत्यारीतील रस्ते पालिकेकडे हस्तांतरित करण्याचे काम सुरू आहे. सहापैकी दोन रस्ते हस्तांतरित झाल्याने त्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. सार्वजनिक उद्यानांमध्ये सुधारणा अपेक्षित असल्यास त्यातही लक्ष घालू."
- गजानन बेल्लाळे, सहाय्यक आयुक्त, एन वॉर्ड
वॉर्ड रेटिंग (५ स्टार पैकी)
रस्ते : ★★★★
स्वच्छता : ★★★★
पाणीपुरवठा : ★★★★★
आरोग्य : ★★★★
पार्किंग : ★★
(अतिशय चांगले - ५ स्टार, चांगले - ४, ठिकठाक - ३, वाईट - २, अत्यंत वाईट - १)