Join us

कुणी तरी अवयवदान केल्याने माझी मुलगी जिवंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 09:06 IST

हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणारी आराध्या राज्यातील पहिली सर्वात लहान मुलगी आहे.   

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :  साडेतीन वर्षांच्या आराध्याला हृदयाचा असाध्य आजार जडला होता. डॉक्टरांनी तिच्या पालकांना मुलीचे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे हाच पर्याय असल्याचे सांगितले होते. मात्र त्यावेळी अवयवदान केल्याने माझी मुलगी जिवंत असल्याचे उद्गार तिचे वडील योगेश मुळे यांनी काढले. हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणारी आराध्या राज्यातील पहिली सर्वात लहान मुलगी आहे.   

आठ वर्षांपूर्वी आराध्याला दोन-तीन मिनिटे चालल्यावर धाप लागत होती. तिचा जीव घाबरल्यासारखा व्हायचा. स्थानिक डॉक्टरांना दाखविले, मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यावेळी एका डॉक्टरांनी आम्हाला हृदयविकार तज्ज्ञांना दाखविण्यास सांगितले. त्यांना दाखविल्यानंतर आराध्याला हृदयाचा आजार असल्याचे त्यांनी निदान केले. आराध्याच्या हृदयाची कार्यक्षमता इतकी कमी झाली होती की, तिला वाचविण्यास हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करावी, असे डॉक्टरांनी सुचविले होते. 

‘डायलेटेड कार्डिओमायोपॅथी’ झाल्याचे निदान  

डॉक्टरांनी एप्रिल २०१६ मध्ये तिला ‘डायलेटेड कार्डिओमायोपॅथी’ झाल्याचे निदान केले होते. या आजारात हृदय बदलणे हा एकमेव पर्याय सुचविला होता. अशा परिस्थितीत आराध्याला कुणी तरी तिच्या वयाचा आणि तिचा रक्तगट जुळणाऱ्या मेंदूमृत मुलाचे हृदय लागणार होते. मात्र त्यावेळी अवयवदान फारच कमी होत होते. 

अवयवदान झालेच तर ते वयस्कर व्यक्तीचे होत असताना अवयवदान जनजागृतीसाठी मुळे कुटुंबीयांनी जनजागृती करण्यास सुरुवात केली होती. समाजमाध्यमांवर ही मोहीम सुरू केली. वर्षभर ही मोहीम सुरू असताना सप्टेंबर २०१७ मध्ये गुजरात येथे एक दोन वर्षांचा मुलगा शिडीवरून पडून मेंदूमृत झाला. 

यावेळी अवयवदान जनजागृती करणाऱ्या एका संस्थेने त्याच्या कुटुंबीयांना आराध्याच्या आजाराबाबत माहिती दिली. अखेर डॉक्टरांनी केलेल्या समुपदेशनामुळे त्यांनी हृदय अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्याचे रक्तगटही जुळत होते. योगशे मुळे म्हणाले, त्या मुलाच्या पालकांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यामुळे आज त्याचे हृदय माझ्या मुलीला मिळाले. माझी मुलगी आज जिवंत आहे. या शस्त्रक्रियेला आठ वर्षे झाली. ती आता सर्वसामन्यांप्रमाणे आयुष्य जगत आहे. 

 

टॅग्स :अवयव दान