मुंबईः नारायण राणेंनी आत्मचरित्र लिहिल्यापासून त्याची मीडियात चर्चा आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी आत्मचरित्रातून खळबळजनक खुलासे केले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं यासंदर्भात वृत्त दिले आहेत. आत्मचरित्रात राणे लिहितात, चंद्रशेखर बावनकुळेंनी मुलीच्या लग्नाचं निमंत्रण मला दिलं होतं. तेव्हा त्या लग्नात माझी मुख्यमंत्र्यांशी भेट झाली. त्यांनीही मला भाजपा प्रवेशाचं आश्वासन दिलं.मुख्यमंत्र्यांनी मला वर्षा बंगल्यावरती भेटण्यासाठी बोलावलं. नंतर काही दिवस सीएम संपर्कात होते. त्याचदरम्यान माझी नितीन गडकरींशीही चर्चा झाली. मला पक्षात घेतल्यास पाठिंबा काढण्याची शिवसेनेनं धमकी दिली. सेनेच्या धमक्यांमुळे भाजपा नेतृत्व अस्वस्थ झालं आणि माझा पक्ष प्रवेश रखडला. तर दुसरीकडे मुख्यमंत्रीही म्हणाले होते की, नारायण राणेंना योग्य सन्मान दिला जाईल. राणेंना त्यांच्या राजकीय वजनानुसार मंत्रिपद द्यावं लागेल, असंही मुख्यमंत्र्यांनी भाजपा नेत्यांना सांगितलं. त्यानंतर नंबर दोनचे नेते चलबिचल झाले. पक्षाच्या भल्यासाठी भाजपात प्रवेश करा, असं सांगणाऱ्या मंत्र्यांना माझा विसर पडला. माझ्या घरी टॅक्सीमधून फेऱ्या मारणारे अचानक गायब झाले. त्या ज्येष्ठ नेत्यांना कळलं माझा प्रवेश झाल्यास त्यांच्याकडची मोठी खाती माझ्याकडे येतील. त्यांना दुसऱ्याचे घर वाचवायला गेल्यास स्वतःचे घर खाली होईल, याची भीती सतावू लागली आणि मला पक्षात घेतलं नाही.
नंबर दोनच्या मंत्र्यांमुळे माझा भाजपा प्रवेश रखडला; नारायण राणेंचा रोख चंद्रकांत पाटलांवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 13:31 IST