महागड्या कारची परस्पर केली विक्री; वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल
By गौरी टेंबकर | Updated: June 1, 2024 17:56 IST2024-06-01T17:55:51+5:302024-06-01T17:56:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: महागड्या अशा मर्सिडिज बेंझ कारचा अपहार करत मेकअप आर्टिस्टची ३५ लाखांची फसवणुक करण्यात आली. याप्रकरणी ...

महागड्या कारची परस्पर केली विक्री; वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: महागड्या अशा मर्सिडिज बेंझ कारचा अपहार करत मेकअप आर्टिस्टची ३५ लाखांची फसवणुक करण्यात आली. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात फहीद कादरी, फरहाद कादरी, मेहमूद कादरी आणि मेहजीन कादरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार रेहाब सय्यद या वांद्रे येथे राहत असून त्यांचे पती झोएब एका बँकेत आयटी मॅनेजर आहे. मेकअप आर्टिस्ट असलेल्या रेहाब यांनी तीन वर्षांपूर्वी एक मर्सिडिझ बेंझ कार ४५ लाख रुपये देत खरेदी केली होती. फहीदच्या मध्यस्थीने तिने कार राकेश पाटील यांच्याकडून घेत त्याला कमिशन दिले होते. डिसेंबर २०२२ त्या कुटुंबियांसोबत सौदी अरेबियाला जाणार असल्याने कार पार्किंगमुळे अडचण होणार होती. फहिदने ती कार त्याच्याकडे ठेवण्यास सांगितल्यावर विशवासाने गाडी त्यांनी त्याच्याकडे सोपविली. जानेवारी २०२३ रोजी तक्रारदार मुंबईत परतल्यावर त्यांनी कार परत मागितली. तेव्हा मेहजबीनने ती कार नवरा आणि सासरा घेऊन गेलेत असे सांगितले.
एक आठवड्यानंतर फहीदने एका कार्यक्रमासाठी कार दिल्याचे सांगून दहा-पंधरा दिवसांत कार आणून देतो असे तक्रारदाराला सांगितले. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने कार परत केली नाही. चौकशीदरम्यान फहीदने सुरेश टेकचंदानी याच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. ते पैसे देता येत नसल्याने ती कार त्याने सुरेशकडे सिक्युरिटीसाठी जमा केली. कारचे पैसे म्हणजे ३५ लाख परत करतो असे आश्वासन आरोपींनी दिले. मात्र नंतर तक्रारदाराला शिवीगाळ करत धमकी देऊ लागले.अखेर याप्रकरणी त्यांनी पोलिसात धाव घेतली.