मुरुड-जंजिरा किल्ला अतिरेक्यांच्या टार्गेटवर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:29 IST2021-02-05T04:29:36+5:302021-02-05T04:29:36+5:30

* एसआयडीला अहवाल : सुरक्षा व्यवस्थेची प्रचंड कमतरता जमीर काझी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित ...

Murud-Janjira fort on terrorists' target? | मुरुड-जंजिरा किल्ला अतिरेक्यांच्या टार्गेटवर?

मुरुड-जंजिरा किल्ला अतिरेक्यांच्या टार्गेटवर?

* एसआयडीला अहवाल : सुरक्षा व्यवस्थेची प्रचंड कमतरता

जमीर काझी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या राज्यातील एक प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या ऐतिहासिक मुरुड-जंजिरा किल्ल्यावर सुरक्षा व्यवस्थेची प्रचंड कमतरता आहे. तो केव्हाही अतिरेक्यांच्या टार्गेटवर येऊ शकतो. पर्यटकांना ओलीस धरण्यासाठी त्याचा दहशतवाद्यांकडून वापर केला जाऊ शकतो, अशी शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली आहे. त्याबाबतचा सविस्तर अहवाल राज्य गुप्तवार्ता विभागाला (एसआयडी) नुकताच सोपविण्यात आला आहे.

चोहोबाजूंनी समुद्रात असलेल्या या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर आणि अंतर्गत भागात सुरक्षेची कसलीही खबरदारी घेण्यात आलेली नाही. तसेच येणाऱ्या पर्यटकांची कोणत्याही प्रकारची तपासणी होत नाही. त्यामुळे कोणीही सशस्त्र त्याठिकाणी सहजपणे प्रवेश करू शकतो, त्यामुळे तातडीने याठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित करण्याची आवश्यकता असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सागरी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी राज्य पोलीस दलाकडून नेहमी सागर सुरक्षा कवच अभियान राबविले जाते. १२ व १३ जानेवारीला ते राबवित असताना गुप्तचर अधिकाऱ्यांनी या किल्ल्याला भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये या ठिकाणी अतिरेकी पर्यटक बोटीने किल्ल्यात प्रवेश करू शकतात. त्यांच्या सामानाची तपासणी होत नसल्याने ते बॅगेतून हत्यारे, स्फोटके घेऊन जाऊ शकतात. तसेच आपल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी तेथे असलेल्या अन्य पर्यटकांना ओलीस धरू शकतात. जर त्यांनी किल्ल्याचा ताबा घेतला, तर पर्यटकांची सुटका करणे अवघड आहे, असे अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात नमूद केले असल्याचे समजते.

.........

असा आहे जंजिरा किल्ला

मुंबईपासून जेमतेम १६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्यातील जंजिरा किल्ल्याची उभारणी १६ व्या शतकात करण्यात आली. चारही बाजूंनी समुद्रात सुमारे २० एकर परिसरातील हा दुर्ग सध्या भग्नावस्थेत आहे. मात्र, देशाचा ऐतिहासिक वारसा व प्राचीन वास्तुकला, आतील गोड पाण्याच्या विहिरी, गावे, मशिदी आजही अप्रतिम कारागिरीचे साक्षीदार म्हणून त्यांच्या खुणा कायम आहेत. त्यामुळे या ठिकाणी फारशा सुविधा नसतानाही पर्यटकांची येथे गर्दी असते. हा किल्ला पाहण्यासाठी छोट्या बोटी किंवा नावेतून सुमारे दीड किलोमीटर जावे लागते. मुरुड गावातील तरुण नावाडी व गाइडची भूमिका पार पाडत आहेत.

Web Title: Murud-Janjira fort on terrorists' target?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.