पत्रकाराच्या हत्येचा कट उधळला
By Admin | Updated: January 2, 2016 08:34 IST2016-01-02T08:34:49+5:302016-01-02T08:34:49+5:30
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम टोळीचा जवळचा हस्तक असलेल्या सय्यद अब्बाज तुबलानीला (४७) अटक करण्यास मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाला यश आले आहे.

पत्रकाराच्या हत्येचा कट उधळला
मुंबई : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम टोळीचा जवळचा हस्तक असलेल्या सय्यद अब्बाज तुबलानीला (४७) अटक करण्यास मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाला यश आले आहे. दाऊदच्या मालमत्तेची खरेदी केल्याच्या रागातून छोटा शकीलच्या सांगण्यावरून त्याने ज्येष्ठ पत्रकार बालाकृष्णन यांच्या हत्येचा कट रचला होता.
दाऊदच्या ७ वेगवेगळ्या मालमत्तांच्या लिलावात बालाकृष्णन यांच्या सेवाभावी संस्थेने सहभाग घेतला होता. त्यासाठी त्यांनी ३० लाख रुपये अनामत म्हणूनही भरले होते. ९ डिसेंबर रोजी कुलाबा येथील हॉटेल डिप्लोमॅट येथे हा लिलाव पार पडला. त्यानंतर गँगस्टर छोटा शकीलने आंतरराष्ट्रीय मोबाइल क्रमांकावरून बालाकृष्णन यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. मात्र त्याच्या धमकीला न जुमानता त्यांनी या लिलावामध्ये भाग घेत पाकमोडिया स्ट्रिटवरील हॉटेल रौनक अफरोज ४ कोटी २७ लाखांना विकत घेतले. बालाकृष्णन यांना येत असलेल्या धमकीच्या फोनचे गांभीर्य लक्षात घेऊन खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय वस्त यांच्या तपास पथकाने अधिक तपास सुरू केला. त्यानंतर पाकिस्तानस्थित असलेला गँगस्टर शकील हा तुबलानीच्या मदतीने बालाकृष्णन यांच्या हत्येचा कट रचत असल्याची माहिती या पथकाला मिळाली. तपास पथकाने वेळीच सापळा रचून हत्येचा कट उधळून लावत तुबलानीच्या मुसक्या आवळल्या. (प्रतिनिधी)