मान्सूनसाठी पालिका सज्ज
By Admin | Updated: June 1, 2015 02:27 IST2015-06-01T02:27:51+5:302015-06-01T02:27:51+5:30
यंदाचा पावसाळा हा सर्व मुंबईकरांना कोणताही त्रास न होता त्यांचे दैनंदिन जनजीवन सुरळीत होईल, अशी पूर्वतयारीची कामे महापालिकेने केली आहेत

मान्सूनसाठी पालिका सज्ज
मुंबई : यंदाचा पावसाळा हा सर्व मुंबईकरांना कोणताही त्रास न होता त्यांचे दैनंदिन जनजीवन सुरळीत होईल, अशी पूर्वतयारीची कामे महापालिकेने केली आहेत. महानगरांतील विविध प्राधिकरणांनीदेखील आपसांत समन्वय साधून पावसाळा हा जनतेसाठी आनंददायी ठरेल असे पाहावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. एकंदर काय तर मान्सूनसाठी मुंबापुरी आणि महापालिका सज्ज झाली असली तरी आता ऐन पावसाळ्यात महापालिकेने
केलेल्या कामांची सत्त्वपरीक्षा लागणार आहे.
मान्सूनपूर्व विविध कामांच्या आढावा महापालिकेच्या बैठकीत घेण्यात आला असून, मुंबईतील विविध विभागांतील पावसाची नोंद व्हावी म्हणून ५८ ठिकाणी ६० पर्जन्यमापक संयंत्रे बसविण्यात आली आहेत. रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी प्रत्येक परिमंडळनिहाय रुपये २ कोटी इतका निधी देण्यात आला आहे. ५ जूनच्या आत ही कामे पूर्ण केली जाणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी अग्निशमन दलाला साधनांसह सज्ज करण्यात आले आहे. पावसाळ्यादरम्यान आपत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ६ ठिकाणी बचाव प्रतिसाद पथक उपलब्ध राहणार आहे. वांद्रे अग्निशमन केंद्र, बोरीवली अग्निशमन केंद्र, विक्रोळी अग्निशमन केंद्र, कुर्ला अग्निशमन केंद्र, बीकेसी अग्निशमन केंद्र्र, चेंबूर अग्निशमन केंद्र यांचा त्यात समावेश आहे.
सर्व चौपाट्यांवर मिळून ४८ जीवरक्षक नेमण्यात आले आहेत. बीच सेफ्टीसाठी जेट स्की, पॉवरबोट उपलब्ध करण्यात आल्या आहेत. गिरगाव चौपाटीसाठी गोवालिया अग्निशमन केंद्र्र, दादर चौपाटीसाठी शिवाजी पार्क अग्निशमन केंद्र, जुहू चौपाटीसाठी गोरेगाव अग्निशमन केंद्र, वर्सोवा चौपाटीसाठी चिंचोली अग्निशमन केंद्र, आक्सा चौपाटीसाठी मालाड अग्निशमन केंद्र आणि गोराई चौपाटीसाठी दहिसर अग्निशमन केंद्र येथे पॉवरबोट, जेट स्की आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ येत्या आठवडाभरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
संभाव्य दुर्घटना अथवा पाणी साचल्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थलांतरित करावे लागल्यास महापालिकेच्या शाळा ‘तात्पुरती निवारास्थाने’ म्हणून तयार ठेवण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)