मुंबई : वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर वारंवार इशारा देऊनही स्वच्छ इंधनात रूपांतरित न झाल्याने शहरातील १०२ बेकऱ्यांना महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून अखेर ‘स्टॉप वर्क’ नोटीस बजावण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२४ पासून केवळ १७५ बेकऱ्यांचे स्वच्छ इंधनात रूपांतर झाले असून ६९ बेकऱ्यांची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित १०२ बेकऱ्यांना १५ जानेवारीपासून स्टॉप वर्क नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईतील बेकऱ्यांमधून प्रदूषण होत असल्याने बेकरी मालकांना विजेवर किंवा गॅसवर चालणाऱ्या स्वच्छ इंधनाचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर ९ जानेवारी रोजी न्यायालयाने आदेश देत ९ जुलैपर्यंत स्वच्छ इंधनात रूपांतर करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर दोनदा मुदवाढ देऊनही २२ ऑगस्टला झालेल्या सुनावणीत बेकरी मालकांनी मुदतवाढही मागितली. मात्र, न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे महापालिका आता बेकऱ्यांवर कारवाई करणार आहे.
प्रदूषण टाळण्यासाठी पीएनजी, एलपीजीचा वापर
मुंबईत ५९३ बेकऱ्या असून त्यातील काही बेकऱ्यांचे स्वच्छ इंधनात रूपांतर झाले आहे आणि काहींची प्रक्रिया सुरू आहे. एकूण ५९३ पैकी २०९ बेकऱ्या या आधीपासूनच पीएनजी, एलपीजी यासारख्या स्वच्छ इंधनावर चालत होत्या. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि पालिकेच्या पाठपुराव्यामुळे १७५ बेकऱ्या स्वच्छ इंधनात परावर्तित झाल्या असून ६९ बेकऱ्यांची प्रक्रिया सुरू आहे.
प्रदूषणात बेकऱ्यांचा सहा टक्के वाटा
२०२३ मध्ये पालिकेने ‘मुंबई एअर पॉल्युशन मिटिगेशन प्लॅन’ तयार केला होता.
या योजनेनुसार बेकऱ्या आणि खाद्यपदार्थांच्या आस्थापनांमधून होणारा धूर व उत्सर्जन हे शहरातील प्रदूषणाच्या प्रमुख स्रोतांपैकी एक असल्याचे समोर आले.
पालिकेच्या माहितीनुसार, मुंबईतील एकूण वायुप्रदूषणात बेकऱ्यांचा सुमारे सहा टक्के इतका वाटा आहे.
हा आकडा तुलनेने कमी वाटत असला तरी बहुतेक बेकऱ्या भायखळा, माझगाव, मालाड आणि सांताक्रूझ यासारख्या घनदाट लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये स्थित असल्यामुळे त्यांचा परिणाम अधिक धोकादायक ठरतो, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कार्यशाळेत मार्गदर्शन
बेकरी मालकांनी स्वच्छ आणि हरित इंधनाचा पर्याय निवडण्याकडे दुर्लक्ष केल्याने पालिकेने त्यांना मदतीचा हात देण्यासाठी कार्यशाळा घेतली. त्यात त्यांना स्वच्छ इंधनाच्या वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पालिका अधिकारी, महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले होते.
Web Summary : Mumbai's municipality issued 'stop-work' notices to 102 bakeries for failing to switch to cleaner fuels despite warnings. Only 175 bakeries have converted, while 69 are in progress. Bakeries contribute 6% to Mumbai's air pollution, posing a significant health risk in densely populated areas.
Web Summary : मुंबई नगर निगम ने चेतावनी के बावजूद स्वच्छ ईंधन में बदलाव नहीं करने पर 102 बेकरियों को 'काम बंद' नोटिस जारी किया। केवल 175 बेकरियाँ परिवर्तित हुईं, जबकि 69 प्रक्रिया में हैं। बेकरियाँ मुंबई के वायु प्रदूषण में 6% का योगदान करती हैं, जो घनी आबादी वाले क्षेत्रों में एक महत्वपूर्ण स्वास्थ्य जोखिम है।