उत्पन्न वाढीसाठी पालिकेचे सरकारला साकडे
By जयंत होवाळ | Updated: February 7, 2024 20:49 IST2024-02-07T20:49:07+5:302024-02-07T20:49:18+5:30
उप्तन्न वाढवण्यासाठी पालिका प्रयत्न करत असून त्यासाठी हिश्श्याची मागणी करण्यात अली आहे.

उत्पन्न वाढीसाठी पालिकेचे सरकारला साकडे
मुंबई : उत्पन्न वाढीसाठी फंजीबल चटईक्षेत्रापोटी प्राप्त होणाऱ्या महसूलाच्या ५० टक्के ऐवजी ७० टक्के हिश्श्याची मागणी मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे केली आहे.विविध पातळीवर घटलेले उप्तन्न वाढवण्यासाठी पालिका प्रयत्न करत असून त्यासाठी हिश्श्याची मागणी करण्यात अली आहे.
मालमत्ता करात वाढ न करण्याचे राज्य सरकारने पालिकेला दिलेले निर्देश , मागील तीन वर्षांत सुमारे दोन हजार कोटींचे झालेले नुकसान, यंदाच्या आर्थिक वर्षात होणारे ७३६ कोटींचे नुकसान, फंजीबल चटई क्षेत्र निर्देशांकाच्या अधिमूल्यात चार वर्षे देण्यात आलेली सवलत आणि त्यामुळे घटलेले सात ते आठ हजार कोटींचे उत्पन्न, या प्रमुख कारणांमुळे पालिकेची तिजोरी आटली आहे.
सन २०२३-२४ मध्ये विकास नियोजन खात्याकडून फंजीबल एफएसआयपोटी ४ हजार ४०० कोटीचे उत्पन्न अपेक्षित अंदाजिले होते. ते ५ हजार ५०० कोटी सुधारित करण्यात आले. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ४०२८.१८ कोटी इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. तर ३०२४-२५ मध्ये विकास नियोजनातून ५ हजार ८०० कोटींचे उत्पन्न अपेक्षित असून सवलतीमुळे ते सुमारे अडीच ते तीन हजार कोटींपर्यंत मिळण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने राज्य शासनाकडे अतिरिक्त ०.५० चटईक्षेत्रापोटी प्राप्त होणाऱ्या महसूलाच्या २५ टक्के ऐवजी ७५ टक्के तसेच फंजीबल चटईक्षेत्रापोटी प्राप्त होणाऱ्या महसूलाच्या ५० टक्के ऐवजी ७० टक्के हिश्श्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.