Join us  

पालिका शाळा बनणार ‘स्मायलिंग स्कूल्स’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2019 6:52 AM

संडे अँकर । शिक्षक, मुख्याध्यापकांना मिळणार प्रशिक्षण; विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी उपक्रम

मुंबई : शाळेत जाणाऱ्या १० मुलांपैकी एका मुलामध्ये मानसिक आजाराशी संबंधित समस्या दिसून येते. यात नैराश्य, ताणतणाव आणि अभ्यासात मन न रमणे अशी लक्षणे आढळतात. त्यामुळे, मुलांना या मानसिक समस्येतून बाहेर काढण्यासाठी शाळेतील शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. यासाठी मुंबईतील पालिका शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना मानसिक आरोग्याचे धडे देऊन मुलांना सक्षम बनविण्याचा उपक्रम पालिका शिक्षण विभाग आणि प्रोजेक्ट मुंबई या सेवाभावी संस्थेकडून सुरू करण्यात आला आहे. ‘स्मायलिंग स्कूल्स प्रोजेक्ट’ असे या उपक्रमाचे नाव आहे.

पालिका शाळांतील विद्यार्थ्यांमधील ताण या प्रोजेक्टमुळे कमी होऊन अभ्यासाच्या दृष्टीने आणि सामाजिकदृष्ट्याही ती अधिक सक्षम होऊ शकतील, अशी अपेक्षा हा उपक्रम राबविणाºया समन्वयकांनी व्यक्त केली. बदललेल्या जीवनाच्या स्पर्धेत अनेक प्रकारच्या आव्हानांना प्रत्येकाला सामोरे जावे लागते. त्यात अभ्यासाचा वाढलेला ताण, त्यातून मुलांमध्ये जास्त गुणांसाठी असलेली स्पर्धा आणि दप्तराचे ओझे अशा अनेक प्रश्नांवर आजही काम करणे आवश्यक असून ते केले जात आहे. मात्र या कारणांमुळे मुलांना कमी वयातच नैराश्याचा सामना करावा लागत आहे. त्यातही पालिका शाळांमधील विद्यार्थी अनेकदा ज्या परिस्थितीमध्ये जीवन जगत असतात त्याचा परिणाम त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्व विकासावर होत असतो. अनेक मुलांच्या घरांमध्ये हिंसा, लैंगिक अत्याचार, व्यसनाचे प्रमाण अधिक असेल, तर ती एकलकोंडी, अबोल होतात, शैक्षणिकदृष्ट्या मागे पडतात. अशा मुलांसाठी ‘स्मायलिंग स्कूल्स’ हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात १५० पालिका शाळांतील इयत्ता ५ वीच्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्यात आलेआहे. आता हे शिक्षक समुपदेशनाद्वारे विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतील, अशी माहिती उपक्रमाच्या समन्वयिका मालविका फर्नांडिस यांनी दिली. या उपक्रमात अपनी शाला, प्रफुल्लता काऊन्सलिंग सेंटर, इन्स्टिट्यूट फॉर एक्सेप्शनल चिल्ड्रन या आणखी तीन सेवाभावी संस्था मदत करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.आढावा घेण्यासाठी मार्गदर्शक शाळांना भेटी देणारप्रत्येक महिन्याला प्रोजेक्टमधील मुंबईचे ३० मार्गदर्शक या शाळांना भेटी देऊन आढावा घेणार असून, त्या वेळी शिक्षकांना जे प्रशिक्षण देण्यात आले आहे, त्यानुसार प्रत्यक्ष कशाप्रकारे विद्यार्र्थ्यांना शिकविले जाते, हे पाहण्यात येणार आहे, असे या उपक्रमाच्या समन्वयिका मालविका फर्नांडिस यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले. यंदा पहिला टप्पा हा ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आला असून, दरवर्षी हा टप्पा एका इयत्तेने वाढविण्यात येईल; आणि ५ वर्षांत ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य घडविण्याचे लक्ष्य पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :शाळा