Join us  

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी महापालिकेचे मिशन धारावी; शर्तीचे प्रयत्न सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 1:15 AM

नवीन आयुक्तांच्या नियुक्तीनंतर हालचालींना वेग

मुंबई : वरळीनंतर धारावीमधील कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे. धारावीमधील कोरोनाबाधितांचा आकडा केव्हाच एक हजार पार गेला आहे. मात्र येथील कोरोनाबाधितांचा आकडा आणखी वाढू नये. कोरोनाबाधितांची संख्या कमी व्हावी. मृत्यू कमी व्हावेत यासाठी महापालिका युद्धपातळीवर काम करत आहे.

विशेषत: नव्याने आयुक्तपदी विराजमान झालेल्या इक्बालसिंह चहल यांनीही धारावीवर विशेष लक्ष केंद्रित केले असून, येथील एकूण ४ हजार ४०७ खाटांची क्षमता अलगीकरणासाठी उपलब्ध होत आहे. यामुळे धारावी भागातील अलगीकरणाचा दर व वेग वाढवणे शक्य झाले आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली. 

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जी/उत्तर विभागात विशेषत: धारावी परिसरातील कोरोना रुग्णांच्या संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन) सुविधेसाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पाहणी केली. अँथनी डिसिल्वा स्कूल, भारत स्काऊट्स अ‍ॅण्ड गाइड्स सभागृह, माहीम निसर्गोद्यान, राजीव गांधी क्रीडा संकुल यासह विविध ठिकाणी केलेल्या व्यवस्थेची जयस्वाल यांनी पाहणी केली. अलगीकरणात वास्तव्यास असलेल्या नागरिकांची विचारपूस करतानाच त्यांना मिळणारे जेवण, इतर सुविधा यांचे निरीक्षणही केले.

या विभागामध्ये कोरोना काळजी केंद्र १ (सीसीसी १)अंतर्गत ३ हजार ७४० खाटांच्या क्षमतेची व्यवस्था करण्यात येत आहे. यामध्ये माहीम निसर्गोद्यान समोरील ३५ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या भूखंडावर २०० खाटांच्या जम्बो फॅसिलिटीचाही समावेश आहे. या जम्बो फॅसिलिटीमध्ये प्रत्येक खाटेवर आॅक्सिजन पुरवठ्याची सोय असेल. कोरोना काळजी केंद्र २ अंतर्गत ६६७ खाटांची क्षमता निर्माण करण्यात आली आहे. सीसीसी १ आणि सीसीसी २ मिळून एकूण ४ हजार ४०७ खाटांची क्षमता अलगीकरणासाठी उपलब्ध होत आहे. यामुळे धारावी भागातील अलगीकरणाचा दर व वेग वाढवणे शक्य झाले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर या विविध विभागांना भेटी देत असून, त्या अनुषंगाने नागरिकांशी चर्चा करत आहेत. सर्दी, ताप व खोकल्याची लक्षणे असणाºया रुग्णांची योग्य ती तपासणी करण्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांच्या शरीरातील आॅक्सिजनचे प्रमाण आॅक्सिमीटरने तपासण्याची सूचना करत आहेत. डॉक्टरांना पीपीई किटची आवश्यकता असेल तर त्यांच्या मागणीप्रमाणे ती तात्काळ उपलब्ध करून देणार असल्याचेही महापौरांनी सांगितले आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या