Join us  

महानगरपालिका रुग्णालये कात टाकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 4:55 AM

मुंबई : यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्यसेवेचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यात आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांनी परिपूर्ण ...

मुंबई : यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्यसेवेचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यात आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांनी परिपूर्ण होऊन लवकरच पालिका रुग्णालये कात टाकणार आहेत. येत्या आर्थिक वर्षात बालरुग्ण आणि नवजात अर्भकांसाठी ३० नवीन व्हेंटीलेटर्स खरेदी करण्याचे प्रस्ताविले आहे. १६ उपनगरीय रुग्णालयांसाठी कॉम्प्यूटराइज्ड रेडिओग्राफी प्रणाली, दहा कलर डॉप्लर्स यूसीजी मशिन्स खरेदी करण्यात येणार आहेत.

सायन, केईएम आणि नायर रुग्णालयात तीन एमआरआय मशिन्स व तीन सिटीस्कॅन मशिन्स खरेदी करण्यात येणार आहेत. त्याची निविदा प्रक्रिया सुरू असून, अंदाजे ४० कोटींच्या खर्चाची तरतूद आहे. फक्त न्यूरोलॉजी रुग्णांसाठी केईएम, नायर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात तीन डी.एस.ए मशिन्स कार्यान्वित केल्या आहेत. केईएम रुग्णालयात न्यूरो शस्त्रक्रिया केंद्र दर्जेदार करण्यात येईल. सायन रुग्णालयात फक्त न्यूरोलॉजीच्या रुग्णांवर उपचारांसाठी दोन कोटी इतक्या खर्चाने नवीन डी.ए.ए.मशीन खरेदी करण्यात आली आहे. नायर रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागातही अशी मशीन लवकरच कार्यान्वित करण्यात येईल.

सायन, केईएम, नायर या रुग्णालयांमधील कान, नाक, घसा, नेत्रचिकित्सा, प्लास्टीक सर्जरी आणि मूत्रशल्यरोग चिकित्सा या विभागांकरिता लेझर मशीन कार्यान्वित करण्यात येईल. गरीब रुग्णांना अत्यल्प खर्चामध्ये लेझर तंत्रज्ञानाद्वारे ‘व्हेरीकोज व्हेन्स’वर उपचार उपलब्ध होतील. विलेपार्ले येथील शिरोडकर प्रसूतिगृह, देवनार शिवाजीनगर येथील प्रसूतिगृह याचेही बांधकाम पुढील सहा महिन्यांत पूर्ण होईल. बोरीवली पंजाबी गल्ली येथे टोपीवाला प्रसूतिगृह व चिकित्सा केंद्रांचे बांधकाम पूर्ण झाले असून, ते लवकरच कार्यान्वित होईल. हे प्रसूतिगृह खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर चालविण्यात येईल. या वर्षांत कांदिवली शताब्दी येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधण्याचे काम हाती घेण्यात येईल.

गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी ५०२ कोटी, राजावाडी रुग्णालय निवासी वैद्यकीय अधिकारी वसतिगृहासाठी १५.२२ कोटी, बोरीवलीच्या आर.एन.भगवती रुग्णालयासाठी ५९२ कोटी, मुलुंड एम.टी.अग्रवाल रुग्णालयासाठी ४५७ कोटी, वांद्रे भाभा रुग्णालयासाठी २८७ कोटी ही कामे प्रगतिपथावर आहेत. नायर रुग्णालयांमध्ये रेडिएशन आॅन्कॉलॉजी सुविधेची दर्जोन्नती करण्यात येत आहे. यामध्ये ‘ब्राची थेरपी’चादेखील समावेश आहे. यासाठी २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. अशाच प्रकारची सुविधा सायन रुग्णालयाच्या कार्यकक्षेतील सायन कोळीवाडा या भागात खासगी-सार्वजनिक भागीदारी अंतर्गत उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

नायर रुग्णालयाकरिता हाजिअली व कूपर रुग्णालयाकरिता टाटा कंपाउंड येथील वसतिगृहांची बांधकामे प्रगतिपथावर असून, यंदाच्या वर्षात पूर्ण होतील. नायर दंत महाविद्यालयात बहुमजली इमारतीचे काम सुरू करण्यात आले आहे. अ‍ॅक्वर्थ रुग्णालयाच्या आवारात केईएम रुग्णालयाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रस्तावित असून, त्यासाठी १०.०३ कोटींची तरतूद आहे. सायन रुग्णालयच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात परिचारिका निवासी वैद्यकीय अधिकारी आणि विद्यार्थी वसतिगृहाच्या नवीन इमारतीचे काम प्रस्तावित असून, या कामाकरिता ६५० कोटी एवढी पुनर्निविदेची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबईहॉस्पिटलमहाराष्ट्र