Join us  

काेराेना लसीच्या साठवणुकीसाठी पालिका रुग्णालये सज्ज; त्वचा, दुग्ध, रक्तपेढ्यांचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2020 4:10 AM

पालिकेच्या सायन रुग्णालयात त्वचा, दुग्ध आणि रक्तपेढ्यांच्या जागेचा वापर लसीचा साठा करण्यासाठी हाेईल.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयांमध्ये काेराेना लसीच्या साठवणीसाठी वेगाने हालचाली सुरू आहेत. केईएम, नायर, सायन आणि कूपर या रुग्णालयांमध्ये मिळून जवळपास २५ हजार लसींचा साठवणुकीची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी रुग्णालयांमधील फार्माकाेलाॅजी, मायक्रोबायोलॉजी विभागांची मदत घेण्यात येईल.

पालिकेच्या सायन रुग्णालयात त्वचा, दुग्ध आणि रक्तपेढ्यांच्या जागेचा वापर लसीचा साठा करण्यासाठी हाेईल. याविषयी, रुग्णालय अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले, ऑक्सफर्डची लस उपलब्ध झाल्यास रुग्णालयात सध्या उपलब्ध असणाऱ्या साठवणुकीच्या व्यवस्थेत तिचा साठा करता येईल. केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले की, लसीसाठी स्टोरेज उपलब्ध करणे हे काहीसे आव्हानात्मक आहे. परंतु, तरीही प्लाझ्मा पेढी आणि रक्तपेढीचा वापर यासाठी करण्यात येईल. तर नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल म्हणाले, आम्हाला दोन शीतपेट्या दानाच्या माध्यमातून मिळाल्या आहेत. शिवाय, लसीकरिता रक्तपेढीचा वापर करण्यात येईल. शीतपेट्यांची उपलब्धता वाढावी यासाठी प्रशासनाकडे मागणी केली आहे.

युद्धपातळीवर प्रयत्न सुरूकोरोनावरील लस ही प्राधान्याने एक लाख फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. त्यामुळे त्या तुलनेत कोल्ड स्टोरेजची व्यवस्था कऱण्यासाठी प्रशासनाकडून गतीने हालचाल सुरू आहे. फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनंतर अतिजोखमीचे आजार आणि वय या निकषांनुसार अन्य व्यक्तींना लसीचा डोस देण्यात येईल. त्यामुळे पुरेशा प्रमाणात लसीच्या साठवणुकीची व्यवस्था व्हावी यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई महानगरपालिकाहॉस्पिटल