मुंबई : राज्यातील महापालिकांची निवडणूक डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांची ऑनलाइन बैठक घेतली. त्यात निवडणुकीसाठीची आमची तयारी असल्याचे बहुतेक आयुक्तांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी या बैठकीत मतदार याद्या अंतिमरीत्या प्रसिद्ध करण्याबाबत आयुक्तांना विचारणा केली. आयोगाने या याद्या १० डिसेंबरला प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्यासाठी आणखी दोन-तीन दिवस लागू शकतात, असे काही आयुक्तांनी सांगितले.
तसा अवधी देण्याची तयारी आयोगाने दर्शविली. आता आयोग ८ डिसेंबरला पुन्हा आयुक्तांची बैठक घेऊन निवडणुकीसंदर्भातील पूर्वतयारीचा (जसे कर्मचारी व इतर व्यवस्था) आढावा घेईल. साधारणत: डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात महापालिका निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
प्रभागनिहाय मतदार याद्या अचूक करा
महापालिका निवडणुकांच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेऊन प्रत्यक्ष मतदानाच्या वेळीदेखील दक्षता घ्यावी. प्रारूप मतदार याद्यांवरील प्राप्त हरकती आणि सूचनांची पडताळणी करून वेळेवर निपटारा करावा. याशिवाय प्रभागनिहाय मतदार यादी तयार करताना झालेल्या चुका निर्दशनास आल्यास तक्रारींची वाट न पाहता स्वत:हून दुरुस्तीबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश वाघमारे यांनी आयुक्तांना दिले.
दुबारांची यादी प्रसिद्ध करा
दुबार मतदारांची यादी संबंधित महापालिकेने आपल्या सूचना फलकावर आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. त्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने २९ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करावी. मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर दोन स्टार (**) दर्शविण्यात आलेले आहेत. असा मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत आवाहन करण्यात यावे.
आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्या मतदारांकडून तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घ्यावा. अशा मतदाराने नमूद केलेले मतदान केंद्र वगळता त्यास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही, असे वाघमारे यांनी स्पष्ट केले.
संभाव्य दुबार नाव असलेल्या मतदाराकडून प्रतिसाद न मिळाल्यास तो मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येईल.
Web Summary : Maharashtra's municipal elections are likely to be announced in the third week of December. The Election Commission reviewed preparations with municipal commissioners and emphasized accurate voter lists, focusing on eliminating duplicate entries before the polls.
Web Summary : महाराष्ट्र में नगर निगम चुनाव दिसंबर के तीसरे सप्ताह में घोषित होने की संभावना है। चुनाव आयोग ने नगर निगम आयुक्तों के साथ तैयारियों की समीक्षा की और सटीक मतदाता सूचियों पर जोर दिया, मतदान से पहले डुप्लिकेट प्रविष्टियों को खत्म करने पर ध्यान केंद्रित किया।