Join us
Daily Top 2Weekly Top 5

Municipal Election 2026: कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 06:26 IST

उमेदवारांकडून ठेवली जातेय प्रचारकांच्या भूकेची विशेष काळजी; जेवणात व्हेज पुलाव-बिर्याणी, खास दिवशी मेन्यूत बदल

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : निवडणूक म्हणजे केवळ मतांसाठीची लढाई नसते, तर ती कार्यकर्त्यांच्या पोटाचीही असते. तारस्वरात घोषणा द्यायला पोटही भरलेले पाहिजे. त्यामुळे प्रचारात सर्वांत आधी ठेवली जाते ती कार्यकर्त्यांच्या खाण्या-पिण्याची उत्तम बडदास्त. कार्यकर्त्यांच्या भोजनावर दररोज लाखो रुपयांचा खर्च होत असल्याचा अंदाज आहे.

गुजरातीबहुल घाटकोपर, मुलुंड पश्चिम किंवा बोरिवलीत प्रचाराची गाडी पोहोचते. येथे सकाळची सुरुवात होते फाफडा-जिलेबीने. ढोकळा, पापडी, हिरवी चटणी आणि गोड चहाचा घोट घेत ! पुढे प्रचार वळतो मराठीबहुल भागांकडे - विक्रोळी, भांडुप, पार्ले. येथे मेनू बदलतो आणि थाळीत गरमागरम मिसळ, सोबत लुसलुशीत पाव. कांदा, लिंबू, तर्री यांचा तडका लागला की कार्यकर्त्यांचा आवाज आपोआपच दुप्पट होतो, ‘साहेब पुढे जा, आम्ही मागे आहोत!’ हा आत्मविश्वास मिसळीच्या वाफेतूनच येतो. दुपारच्या वेळेला व्हेज पुलाव किंवा बिर्याणी, कोशिंबीर आणि ताक. बुधवार, शुक्रवार आणि रविवारी मेनूत ‘बदल’ असतो, हे सुज्ञास सांगणे न लगे... संध्याकाळी चहा-बिस्किटे, रात्री साधेच; पण पोटभर जेवण.

वडापावची फर्माईश अधिक, पावभाजीलाही मागणी

मुंबईत प्रचारासाठी खपणाऱ्या कार्यकर्त्यांकडून वडापावला अधिक मागणी आहे. पूर्वी रोज ३०० वडापावची विक्री होत होती; मात्र प्रचार सुरू झाल्यापासून रोज १,००० ते १,२०० वडापावची विक्री होत असल्याचे गोरेगावमधील एका स्टॉलमालकाने सांगितले. खानावळी, कॅटरिंग व्यावसायिकांना सध्या चांगले दिवस आले आहेत. नेहमीपेक्षा दुप्पट ऑर्डर येत आहेत, असे एका पावभाजी विक्रेत्याने सांगितले.

समोसा, कांदापोहे आणि लापशीही

सकाळी वडापाव, समोसा, कांदापोहे किंवा लापशी असा नाष्टा दिला जातो. दुपारी जेवणाची व्यवस्था केली जाते. काही ठिकाणी रात्रीचे जेवणही दिले जाते. काही उमेदवारांनी थेट कॅटरर्स किंवा पोळी-भाजी केंद्राशी ‘टायअप’ केले आहे. या ठिकाणी भाजीपाला, धान्य उमेदवारांकडून पुरवले जाते आणि केवळ स्वयंपाकाचे शुल्क दिले जाते. त्यामुळे दोन वेळा ताजे जेवण कार्यकर्त्यांना मिळते. काही उमेदवारांनी सभागृह किंवा हॉल बुक करून तेथूनच प्रचाराचे नियोजन केले आहे. सकाळी कार्यकर्ते जमले की चहा-नाष्टा, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा-बिस्किटे आणि रात्री जेवण अशी सलग व्यवस्था सभागृहात केली आहे.

कल्याण-डोंबिवलीत उपवासासाठी साबुदाणा खिचडी

सकाळी प्रचार सुरू होण्यापूर्वी वडापाव, समोसा, कांदेपोहे, उपमा आणि चहा असा नाष्ट्याचा मेनू आहे. काही पक्षांकडून तयार खाद्यपदार्थांचे बॉक्सही दिले जात आहेत. काही ठिकाणी भाकरी, एक भाजी, भात, डाळ, लोणचे, पापड आणि मिष्टान्न अशा घरगुती जेवणाची सोय केली जात आहे. उपवासादिवशी साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडा याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येते.

पोह्यांसह सामिष जेवणाला नवी मुंबईत पसंती

सकाळी नाष्ट्यासाठी वडापावसह पोह्यांना पसंती दिली जात आहे. दुपारच्या जेवणात रेडीमेड बिर्याणीसह व्हेज थाली देण्यात येत आहे. संध्याकाळी मात्र मांसाहारी जेवण देण्यात येते. काही उमेदवार नेहमीच्या कॅटरर्सकडून जेवण मागवीत आहेत. काहींनी खर्च कमी करण्यासाठी आपल्या कार्यालय वा निवासस्थानाच्या परिसरात स्वयंपाकघरे थाटली आहेत. घोषणा देऊन घसा बसलेल्या कार्यकर्त्यांना बुधवार, शुक्रवार, रविवारच्या दिवशी ‘खास औषध’ दिले जात आहे.

उल्हासनगरात वडापाववर भर

नाष्ट्यासाठी वडापाव, समोसा, भजी या पदार्थांवर भर आहे. रात्री जेवणही दिले जाते. सायंकाळी रॅलीतील कार्यकर्त्यांना बहुतांश उमेदवाराकडून जेवणाची व्यवस्था केली जाते. मोठ्या पक्षांतील कार्यकर्त्यांनी तर विशेष स्वयंपाकघर उघडून कार्यकर्ते व नागरिकांची जेवणाची व्यवस्था केली आहे.

भिवंडीत ढाबे हाऊसफुल्ल

सकाळी वडापाव, समोसा आणि रात्री बिर्याणी व ढाब्यावर जेवणावळी होत आहेत. हॉटेलसह वडापावच्या गाड्यांवर विक्री वाढली आहे; तर रात्री कार्यकर्त्यांसाठी बिर्याणीचा खास मेनू असतो. ढाब्यांवर रात्री उशिरापर्यंत जेवणावळी सुरू असतात.

वसईत चहा-वडापावसह गरमागरम थाळीची सोय

नाष्ट्याला वडापाव, मिसळपाव, समोसा, इडली, कांदेपोहे, उपमा... त्यासोबत चहा, कॉफी तर दुपारी जेवणाची थाळी दिली जाते. सायंकाळीही चहा-नाष्टा, तर अनेकांना रात्रीच्या जेवणात मिष्टान्न मिळते. दुपारी कार्यालयात घरगुती जेवण देण्यावर पक्षांचा भर आहे. रात्री काही पक्षांकडून भाजी-पोळी, जिरा राइस, दालफ्राय, पापड असे मिष्टान्न दिले जाते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Election rallies fuel feasts: Misal Pav to Jalebi-Fafda for workers.

Web Summary : Election campaigns prioritize worker meals, with costs reaching lakhs daily. Menus vary regionally, from Misal Pav in Marathi areas to Fafda-Jalebi in Gujarati areas. Vada Pav demand surges. Diverse meals, including vegetarian and non-vegetarian options, ensure energized campaigners.
टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६अन्ननिवडणूक 2026मतदानमुंबई महानगरपालिकामुंबई महापालिका निवडणूक २०२६