Join us  

CoronaVirus: काेराेनाबाधिताला तपासण्यासाठी पालिकेचे डॉक्टर येणार घरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 5:45 AM

तपासणीनंतरच मिळणार खाट; नियमाची उद्यापासून अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयात खाट न मिळाल्यामुळे होम क्वारंटाईन व्हावे लागत आहे. यामुळे अनेकवेळा रुग्णाची प्रकृती गंभीर होण्याचे प्रकार घडत असल्याने बाधित रुग्णाला तपासण्यासाठी पालिकेचे डॉक्टर आता थेट रुग्णांच्या घरी पोहोचणार आहेत. वैद्यकीय तपासणीनंतरच आवश्यकतेनुसार संबंधित रुग्णाला रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. वॉर्ड वॉर रुमद्वारे या वैद्यकीय तपासण्यांचे समन्वयन केले जाणार आहे. येत्या रविवारपासून याची अंमलबजावणी होणार आहे.कोरोनाबाधित रुग्णांना खाटांचे वाटप करण्याचे अधिकार विभाग स्तरावरील वॉर रूमला देण्यात आले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याची दखल घेऊन आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी शुक्रवारी विशेष बैठक बोलावली होती. या ऑनलाईन बैठकीला अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे, संजीव जयस्वाल, पी. वेलरासू, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल, विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता आदी उपस्थित होते.

दहा चमूंमार्फत अशी हाेणार तपासणीलक्षणे, तीव्र लक्षणे असणाऱ्या कोविड रुग्णांची वैद्यकीय चमुद्वारे तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर आवश्‍यकतेनुसार संबंधित रुग्णाला वॉर्ड वॉर रूममार्फत खाट देण्यात येणार आहे. या तपासणीसाठी सर्व २४ विभागांमध्ये प्रत्येकी किमान १० चमू कार्यरत असतील, तर प्रत्येक चमुसाठी एक यानुसार प्रत्येक विभागात १० रुग्णवाहिका असतील.सकाळी ७ ते रात्री ११ या कालावधीत ही तपासणी होईल. रात्री ११ ते सकाळी ७ या कालावधीमध्ये एखाद्या रुग्णाची वैद्यकीय तपासणी तातडीने करणे गरजेचे असल्यास अशी तपासणी महापालिकेच्या जम्बो कोविड उपचार केंद्रांमध्ये केली जाणार आहे.

खाटा नसल्यास प्रतीक्षा यादीतएखाद्या रुग्णास वैद्यकीय चमूने वितरण केलेली रुग्णालयातील खाट उपलब्ध नसल्यास अशा रुग्णाला प्रतीक्षा सूचीवर ठेवण्यात येईल. काही तासांनी खाट उपलब्ध झाल्यानंतर संबंधित रुग्णाला त्याचे वितरण करण्यात येईल.

३० हंटिंग लाइनवॉर्ड वॉर रूमकडे येणाऱ्या दूरध्वनींची संख्या गेल्या काही दिवसांत वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक वॉर रुममधील दूरध्वनी क्रमांकाला ३० हंटिंग लाइनची सुविधा एमटीएनएलकडून उपलब्ध केली जाणार आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या