Join us
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा सांताक्लॉजरूपी स्वच्छतादूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 04:44 IST

मुंबईकरांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यासाठी महापालिकेच्या एन विभागामार्फत या वेळेस नवीन शक्कल लढवली आहे.

मुंबई : मुंबईकरांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यासाठी महापालिकेच्या एन विभागामार्फत या वेळेस नवीन शक्कल लढवली आहे. नाताळ सणानिमित्त बच्चेकंपनीला भेटवस्तू देत फिरणारा सांताक्लॉज या वेळेस स्वच्छतेचा संदेशही देणार आहे. घाटकोपर आणि विक्रोळी परिसरात आजपासून ३१ डिसेंबरपर्यंत हा सांताक्लॉज गर्दीच्या ठिकाणी दिवसा अवतरणार आहे. मात्र त्याच्या गाठोड्यातून भेटवस्तूंबरोबरच साफसफाईचा मंत्रही बाहेर पडणार आहे. हा प्रयोग अन्य विभागांमध्येही करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानांतर्गत महापालिकेने मुंबईत सफाई मोहीम सुरू केली. स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये या मोहिमेद्वारे जागृती करण्यात आली. या मोहिमेला लोकांकडून प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेला आणखी प्रभावी करण्यासाठी या वेळेस सांताक्लॉजची मदत महापालिका घेणार आहे. महापालिकेच्या या सांताक्लॉजमार्फत स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन या विषयांशी संबंधित वेगवेगळेसंदेश शालेय विद्यार्थ्यांना आणि परिसरातील नागरिकांना दिलेजात आहेत.लहान मुलांना सांताक्लॉज स्वत:च्या हाताने एक ‘गिफ्ट’देखील देत आहे. त्याचबरोबर जे नागरिक रस्त्यावर किंवा पदपथावर कचरा फेकतील त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगण्यासोबतच स्वच्छतेचा संदेश असलेले एक छोटेसे ‘ग्रीटिंग कार्ड’देखील सांताक्लॉजच्या हातूनच ‘गिफ्ट’ स्वरूपात मिळत आहे. स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या सांताक्लॉजला भेटण्यासाठी आणि त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी लहानांसोबत मोठ्यांचीही गर्दी घाटकोपर आणि विक्रोळी परिसरात दिसून येत आहे. 

टॅग्स :नाताळमुंबई