आरोग्य कर्मचा-याकडे महापालिकेचे दुर्लक्ष !
By Admin | Updated: January 28, 2015 01:30 IST2015-01-28T01:30:47+5:302015-01-28T01:30:47+5:30
महापालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयातील क्ष^-किरण विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

आरोग्य कर्मचा-याकडे महापालिकेचे दुर्लक्ष !
मुंबई : महापालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयातील क्ष^-किरण विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे या कर्मचाऱ्यांना थर्मोल्युमिनिसेंट डोसिमीटर (टीएलडी) बॅच देण्यात आलेला नाही.
क्ष-किरण विभागात काम करणारे कर्मचारी हे सतत किरणोत्सर्गाच्या सान्निध्यात असतात. त्यांच्या शरीरावर किरणोत्सर्ग किती प्रमाणात झाला आहे, हे मोजण्यासाठी या कर्मचाऱ्यांना थर्मोल्युमिनिसेंट डोसिमीटर (टीएलडी) बॅच दिला जातो. पण केईएममधील कर्मचाऱ्यांना गेली ३ वर्षे, तर नायर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना एक वर्षापासून हा बॅच दिला गेला नाही. सतत किरणोत्सर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने कर्करोग होण्याचा धोका बळावतो. हृदयरोग, न्यूरोलॉजिकल आजार होण्याचा धोका संभावतो.
केस गळणे, डोकेदुखी असा त्रास देखील जाणवतो. किरणोत्सर्गामुळे होणारे आजार हे प्राथमिक अवस्थेत असताना दिसून येत नाहीत. पण त्यामुळे होणारे नुकसान हे भयंकर असते. गेल्या १० वर्षांमध्ये क्ष-किरण विभागातून जितके कर्मचारी निवृत्त झाले आहेत, त्यापैकी सुमारे २० टक्के कर्मचाऱ्यांना कर्करोग झाला आहे, असे एका वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.
केईएमच्या क्ष-किरण विभागात एकूण ७३ कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र एकालाही गेल्या तीन वर्षांत एकदाही टीएलडी बॅच दिलेला नाही. हीच परिस्थिती नायर रुग्णालयात गेल्या एका वर्षापासून आहे. नायर रुग्णालयाच्या क्ष-किरण विभागात २८ कर्मचारी कार्यरत आहेत.
क्ष-किरण विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टीएलडी बॅचद्वारे किरणोत्सर्गाचे मापन करता येते. दर ३ महिन्यांनी तपासणी करून किरणोत्सर्गाचे प्रमाण मोजतात. त्रास होणाऱ्या कर्मचाऱ्याची दुसऱ्या विभागात बदली करतात अथवा त्यांना सुटी दिली जाते, असे म्युनिसिपल मजदूर युनियनेचे सेक्रेटरी महेश दळवी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)