Join us

मलवाहिन्यांच्या सफाईसाठी महापालिका घेणार ‘रोबो’ची मदत, 'इतके' कोटी खर्चून पालिका प्रशासन रोबो खरेदी करणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 14:02 IST

रोबोच्या खरेदीची प्रक्रिया जानेवारी २०२५ पासून सुरू झाली आहे. निविदा प्रक्रिया १७ जून २०२५ रोजी पूर्ण झाल्यानंतर आता खरेदी करण्यात येत आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या जुन्या मलवाहिन्यांची सफाई करताना कामगारांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर जेथे मलवाहिन्यांची सफाई करणे अत्यंत जिकिरीचे अशा ठिकाणची सफाई आता रोबो करणार आहे. ८.१४ कोटी रुपये खर्चून पालिका प्रशासन रोबो खरेदी करणार आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांमधील  विविध आकारांच्या मलवाहिन्यांची सफाई यंत्राद्वारे केली जाते; परंतु बऱ्याच वेळा या  सफाईदरम्यान मलवाहिन्यांमध्ये दगड, माती, सिमेंट काँक्रीट जाऊन मलवाहिन्या जाम होतात. अशावेळी त्यातील मलमिश्रित पाणी बाहेर रस्त्यांवर वाहू लागते. काही मलवाहिन्यांमध्ये झाडांची पाळेमुळे पसरून ती अधिक घट्ट होऊन जातात आणि यामुळे मलमिश्रित पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो.

त्यामुळे  रोबोचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. केंद्र सरकारच्या अमृत २.० योजनेंतर्गत शहरी स्थानिक संस्थाअंतर्गत महापालिकेला प्राप्त झालेल्या निधीतून रोबोची खरेदी करण्यात येणार आहे.  हा रोबो मिशनरी उच्च तंत्रज्ञानावर आधारित असल्याने तसेच त्याची देखभाल करण्यासाठी मलनिस्सारण प्रचलन विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने  खरेदीसोबतच देखभालीची जबाबदारी संबंधित कंपनीवर सोपविण्याचा  निर्णय घेतला आहे.

निविदा प्रक्रिया पूर्ण रोबोच्या खरेदीची प्रक्रिया जानेवारी २०२५ पासून सुरू झाली आहे. निविदा प्रक्रिया १७ जून २०२५ रोजी पूर्ण झाल्यानंतर आता खरेदी करण्यात येत आहे. यासाठी आर्यन पंप्स अँड एन्व्हायरो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई