Join us

BMC Schools: महापालिकेच्या विद्यार्थ्यांना शाळेतच करिअरचे बाळकडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 13:57 IST

Mumbai News: मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने आपल्या माध्यमिक शाळांमध्ये नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम सुरू केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने आपल्या माध्यमिक शाळांमध्ये नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम सुरू केला आहे. भविष्यात योग्य शाखेची निवड करणे, तसेच स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने हे मार्गदर्शन दिले जाणार आहे. हा उपक्रम पुढील काही दिवसांत  सुरू होणार असून, तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मदतीने हा उपक्रम राबवला जाणार आहे.

महापालिकेच्या ४९ माध्यमिक शाळांमध्ये १४,४५७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांची आवड, क्षमता आणि कल ओळखण्यासाठी सोप्या प्रश्नावली, ऑनलाइन टेस्ट आणि व्यावसायिकांचे व्हिडीओ सत्र यांचा समावेश असणार आहे. अकरावीत कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा, यापासून व्यावसायिक शिक्षण, स्किल डेव्हलपमेंट, डिप्लोमा कोर्सेस, आणि नव्याने उदयाला आलेल्या क्षेत्रांबद्दल- जसे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल मार्केटिंग, ग्रीन टेक्नॉलॉजी याबाबतही माहिती दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना दर शनिवारी हे करियर मार्गदर्शन केले जाणार आहे. 

महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून दर शनिवारी ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी विविध व्यवसायांबाबत मार्गदर्शन दिले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःचे भविष्य निवडण्यास मदत होणार आहे, मुंबई महापालिकेचे शिक्षण उपआयुक्त प्रांची जांभेकर म्हणाले आहे.

दहावीनंतर योग्य दिशा मिळणारपालिकेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना दहावीनंतर  योग्य दिशा ठरवता येईलच, शिवाय उच्च शिक्षणासाठी आवश्यक नियोजन, शिष्यवृत्तीची माहिती आणि मानसिक तयारीदेखील यात करून घेतली जाणार आहे. 

टॅग्स :महापालिका शाळामुंबई