Join us  

महापालिका मुंबई अग्निशमन दलाच्या नेहमी पाठीशी; अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 11:16 AM

सैन्यदलातील तत्परता, निर्णयक्षमता, एकीचे बळ मी खूप जवळून पाहिले आहे. तसाच अनुभव या स्पर्धा पाहताना आला.

मुंबई : सैन्यदलातील तत्परता, निर्णयक्षमता, एकीचे बळ मी खूप जवळून पाहिले आहे. तसाच अनुभव या स्पर्धा पाहताना आला. सीमेवर प्रत्येक जीव वाचविण्यासाठी सांघिक प्रयत्न गरजेचे असतात. त्याचप्रमाणे मुंबईत जेव्हा एखादी दुर्घटना घडते तेव्हाही प्रत्येक क्षणाला खूप महत्त्व असते. त्यामुळे कोणतेही आव्हान आले तरी, मागे हटू नका. पालिका मुंबई अग्निशमन दलाच्या पाठीशी असेल, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी व्यक्त केला.

मुंबई अग्निशमन दलाअंतर्गत वार्षिक अग्निकवायत स्पर्धा-२०२४ची अंतिम फेरी भायखळा येथील मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्यालयात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपआयुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड, प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर, मुंबई पोर्ट ट्रस्टचे प्रमुख अग्निशमन अधिकारी इंद्रजीत चढ्ढा यांच्यासह अग्निशमन दलाचे अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. मुंबईत जितक्या उंच इमारती आहेत, तितक्याच अरुंद गल्ल्याही आहेत. त्यामुळे जेव्हा दुर्घटना घडते, तेव्हा या दोन्ही पातळींवरील आव्हान पेलण्यास मुंबई अग्निशमन दल सज्ज असते. 

१) समन्वय प्रत्यक्ष घटनास्थळी कायम ठेवावा, अशी अपेक्षा डॉ. अमित सैनी यांनी व्यक्त केली. मुंबई अग्निशमन दल म्हणजे महानगरपालिकेच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. 

२) या दलाची सज्जता कौतुकास्पद आहे. अग्निशमन दलाच्या अडचणी सोडविण्यासाठी महानगरपालिका प्रशासन पाठीशी आहे, असे उपायुक्त प्रशांत गायकवाड म्हणाले.

अधिकारी, उपप्रमुख, प्रशिक्षकांचा सन्मान! 

राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण अग्निशमन सेवापदक प्राप्त उपप्रमुख अग्निशमन अधिकारी हरिश्चंद्र शेट्टी, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी अनिल परब, विभागीय अग्निशमन अधिकारी देवेंद्र पाटील, दुय्यम अधिकारी राजाराम कुदळे, प्रमुख अग्निशामक किशोर म्हात्रे, प्रमुख अग्निशामक मुरलीधर आंधळे यांचाही डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून वडाळा प्रशिक्षण केंद्रातील अविनाश शिर्के यांचा सन्मान करण्यात आला.

टॅग्स :मुंबईनगर पालिकाअग्निशमन दल