खारफुटींसाठी पालिका सरसावली
By Admin | Updated: May 31, 2014 03:10 IST2014-05-31T03:10:38+5:302014-05-31T03:10:38+5:30
मुंबईतील खारफुटी (मॅनग्रोव्ह) झाडांचे संवर्धन करण्यासाठी आता महानगरपालिका प्रशासन तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणार आहे.

खारफुटींसाठी पालिका सरसावली
मुंबई : मुंबईतील खारफुटी (मॅनग्रोव्ह) झाडांचे संवर्धन करण्यासाठी आता महानगरपालिका प्रशासन तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणार आहे. विशेष म्हणजे खारफुटी झाडांच्या विभागांची वृक्ष प्राधिकरण पाहणी करणार आहे. मुंबई शहराची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता समुद्राच्या आसपास बर्याच प्रमाणात खारफुटीची वने आहेत. त्या वनांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी पालिका प्रशासन या क्षेत्रातील शासकीय अधिकारी व तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणार आहे. याबाबत, लवकरच संगणकीय सादरीकरण व संयुक्त आढावा बैठकही आयोजित करण्यात येणार आहे. वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्यांसमवेत आणि तज्ज्ञ अधिकार्यांसमवेत खारफुटी विभागाचा संयुक्त पाहणी दौराही आयोजित करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकूण ३९ विषय मंजूर करण्यात आले आहेत. वृक्षछाटणी व इतर पावसाळापूर्व कामांची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. शिवाय, वृक्षछाटणी व वृक्षसंवर्धनासाठी लागणार्या बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. आतापर्यंत संपूर्ण मुंबईत एक लाखांपेक्षाही जास्त झाडांच्या फांद्यांची छाटणी केली आहे. येत्या पावसाळ्यात कमीतकमी वृक्ष उन्मळून पडतील. कारण, झाडांच्या फांद्यांचा समतोल राखून वृक्षछाटणी केली आहे. झाडांचे पुनर्रोपण करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराला पुनर्रोपण केलेली झाडे तीन वर्षे जगल्यानंतरच त्याचे पैसे देण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील रेल्वे जमिनीलगत असलेली २९ झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. ४०७ झाडांच्या फांद्याही छाटल्या आहेत. (प्रतिनिधी)