Join us
Daily Top 2Weekly Top 5

भूखंडांच्या लिलावातून महापालिका मालामाल; तिजोरीत १,२४८ कोटी रुपयांची भर : विकासकामांवर करणार खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 09:12 IST

वरळी येथील अस्फाल्ट प्लांटच्या लिलावातून ८७९ कोटी, तर क्रॉफर्ड मार्केट येथील भूखंडातून ३६९ कोटी रुपये मिळणार आहेत. क्रॉफर्ड मार्केट येथील भूखंडातून ४०० कोटी मिळण्याची अपेक्षा होती.

मुंबई : महसूल वाढविण्यासाठी मुंबई महापालिकेने विविध स्तरांवर प्रयत्न सुरू केले असून, आता त्याला यश येत आहे. क्रॉफर्ड मार्केट आणि वरळी येथील अस्फाल्ट प्लांट या दोन भूखंडांच्या लिलावातून पालिकेला एकूण एक हजार २४८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. दरम्यान, या उत्पन्नाचा विनियोग पालिका विविध विकासकामांसाठी करणार आहे.

वरळी येथील अस्फाल्ट प्लांटच्या लिलावातून ८७९ कोटी, तर क्रॉफर्ड मार्केट येथील भूखंडातून ३६९ कोटी रुपये मिळणार आहेत. क्रॉफर्ड मार्केट येथील भूखंडातून ४०० कोटी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, आवा डेव्हलपर्स या कंपनीने ३६९ कोटी रुपयांची बोली लावली. अशाप्रकारे पालिकेने पहिल्यांदाच आपल्या भूखंडांसाठी बोली लावून उत्पन्न मिळविले आहे.

पालिकेने जवळपास एक लाख कोटी रुपये किमतीचे विविध पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यापैकी अनेक प्रकल्पांची कामे सुरूही आहेत. आर्थिक स्थिती सध्या कमकुवत असल्याने उत्पन्नाचे विविध स्रोत शोधण्याचे काम पालिकेकडून सुरू आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून भूखंडांचा लिलाव करण्यात आला आहे. खरे तर ही लिलाव प्रक्रिया आठ महिन्यांपूर्वीच सुरू होण्याची अपेक्षा होती. परंतु त्यास काही कारणास्तव विलंब झाला.

रिझर्व्ह बँकेचा सहभाग नाही

वरळीच्या प्लांटमध्ये रिझर्व्ह बँकेने रुची दाखवली होती. परंतु त्यासाठी अर्ज करण्यास विलंब केला.

शिवाय, ते लिलाव प्रक्रिया सहभागी झाले नाहीत. त्यामुळे या दोन्ही भूखंडांचा लिलाव करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली होती.

उच्च दाबाच्या वाहिन्यांमुळे ‘बेस्ट’चा आक्षेप

यापूर्वी मलबार हिल येथील एक भूखंड लिलावात काढण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्यास आक्षेप घेण्यात आल्याने त्याचा लिलाव झाला नाही.

या भूखंडाच्या लिलाव प्रक्रियेस बेस्ट उपक्रमाने आक्षेप घेतला होता. या भूखंडावर उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या आहेत, असे बेस्टचे म्हणणे होते. 

टॅग्स :मुंबई