तुमचे फोटो छापलेले रंगीत कागद दाखवताच..!
By अतुल कुलकर्णी | Updated: January 4, 2026 10:00 IST2026-01-04T09:59:05+5:302026-01-04T10:00:27+5:30
महाराष्ट्रातल्या महापालिकेच्या निवडणुका पाहायला तुम्ही हवे होतात.

तुमचे फोटो छापलेले रंगीत कागद दाखवताच..!
अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई
प्रिय बापू,
महाराष्ट्रातल्या महापालिकेच्या निवडणुका पाहायला तुम्ही हवे होतात. तुम्ही कल्पनाही केली नसेल इतका तीव्र आनंद देणाऱ्या वातावरणात निवडणुका होत आहेत. प्रत्येक उमेदवाराला गल्लीचा, गावाचा किती विकास करू, किती नको असे झाले आहे. विकासाचे हे वारे तुम्ही स्वातंत्र्यलढ्यात सुद्धा अनुभवले नसेल, इतके ज्वलनशीलही आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देताना तुम्ही पदांसाठी भांडत नव्हतात, हे काही बरोबर नव्हते. बापू, तुम्ही तर पंतप्रधानपद बॅरिस्टर मुहम्मद अली जिना यांना द्यायला निघाला होता. आज काय चालू आहे...? मला उमेदवारी हवी म्हणून लोकांनी स्वतःचे कपडे काढून घेतले... ढसाढसा रडले... अनेकांचे डोळे पांढरे झाले... उमेदवारी अर्ज परत घ्यायच्या दिवशी कोणी कोणाला कोंडून ठेवले... कोणी कोणाला बांधून ठेवले... इतकेच कशाला भोसका भोसकीही झाली...
विकासासाठी, पदासाठी इतकी टोकाची ईर्ष्या, इतका तीव्र संघर्ष... एवढेच नाही तर आम्ही एबी फॉर्म कसा खायचा तेही शिकवले... (मस्त लागतो चवीला) बापू, तुमच्या काळात असे काही नव्हते ना...
बापू , बुरा मत देखो... बुरा मत कहो... बुरा मत सुनो... ही शिकवण तुम्ही तीन माकडांच्या प्रतिकामधून जगाला दिली. आम्ही त्याच शिकवणीवर विश्वास ठेवून आहोत. या निवडणुकीत, आम्ही आमचे कुठेही वाईट झालेले बिलकुल सहन करत नाहीत... कोणीही वाईट बोललेले ऐकून घेत नाहीत... आणि कोणीही कितीही वाईट केले तरी त्याकडे लक्ष देत नाहीत... हे असेच तुम्हाला अपेक्षित होते ना बापू..! बघा तुमच्या शिकवणीचा आम्ही किती फायदा करून घेतला आहे..!
पण बापू, साधी राहणी उच्च विचार ही तुमची शिकवण होती की अन्य कोणाची? कारण तुमचं नाव घेणाऱ्यांपासून ते तुमचा दुस्वास करणाऱ्यापर्यंत, प्रत्येकाला उच्च आणि योग्य वाटतात तेच विचार आवडतात. आमचे अनेक नेते निवडणुकीच्या मैदानात याच आचार विचाराचा अंगीकार करतात. बापू, राहणी आणि विचार हे महत्त्वाचे नाही. या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही जे पायंडे पाडले आहेत, आम्ही ज्या प्रथा परंपरा मजबूत केल्या आहेत, ते जास्त महत्त्वाचे आहेत. त्याचे वर्णन करायला आमच्याकडे शब्द नाहीत.
लोकशाही मार्गाने होणाऱ्या या निवडणुकीत आम्ही असंख्य जागा बिनविरोध निवडून आणल्या ते केवळ आणि केवळ तुमच्यावरील श्रद्धेमुळे..! अनेकांना आम्ही तुमचे फोटो छापलेले रंगीत कागद काय दाखवले, बापू त्यांच्यात एकदम मतपरिवर्तनच झाले..! सत्तेचे प्रयोग काय असतात हे आम्ही याची देही याची डोळा अनुभवले..! आम्ही आमच्या मित्राला सांगितले, तर तो म्हणाला सत्तेचे नाही ते सत्याचे प्रयोग होते. कशाचे का प्रयोग असेनात बापू... तुमच्यावरील श्रद्धेमुळे आमचे किती मार्ग सोपे झाले हे तुम्हाला नाही कळणार..? (कळाले असते तर तुम्ही हा देश इंग्रजांना भाडेतत्त्वावर चालवायला दिला असता. त्यांनी देखील तो घ्यायला नकार दिला असता तर... असे आमचा मित्र म्हणत होता.) असो.
सत्य परेशान हो सकता है पराजित नही... असे तुम्ही म्हणाल्याचे आम्हाला गुगल अंकलनी सांगितले होते. त्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही या निवडणुकीत घेतला. तुमचे सत्तेचे की सत्याचे प्रयोग असे एका रात्रीतून खरे होतील याची आम्ही कल्पनाही केली नव्हती. आत्ता कुठे उमेदवारी अर्ज मागे घेऊन झाले आहेत. पंधरा तारखेला मतदान आहे. बापू, तोपर्यंत जिथे जिथे शक्य आहे, तिथे सगळ्यांना तुमचे फोटो छापलेले कागद दाखवू. तुमचे फोटो असलेले जास्तीत जास्त कागद जवळ बाळगणे हेच अंतिम सत्य आहे, हे सगळ्यांना कळून चुकले आहे. बापू, तुमच्यावरील या अगाध श्रद्धेमुळे अनेकांनी विचार, भूमिका, पक्ष, डावे, उजवे, पुरोगामी, समाजवादी अशा तकलादू आणि क्षणभंगुर गोष्टींचा कसलाही विचार केला नाही. तुमच्या फोटोंचे जास्तीत जास्त कागद जो देईल त्याच्यासोबत आम्ही गेलो... आम्ही आहोत... आणि राहू...
बापू तुमचे आवडते भजन आम्हाला सध्या कामाला येत आहे..!
वैष्णव जन तो तेने कहिये,
जे पीर परायी जाणे रे
पर दुःखे उपकार करे तो ये,
मन अभिमान न आणे रे
सकल लोकमां सहुने वंदे,
निंदा न करे केनी रे
बापू , जे दुसऱ्यांचे दुःख समजतात, तेच खरे आपले लोक असतात. दुसऱ्यांच्या दुःखात मदत करणारे, मनात काडीचाही गर्व आणत नाहीत. ते सर्वांना नमस्कार करतात. कोणाची निंदा करत नाहीत... बापू , आमच्या आजूबाजूला असेच तर लोक आहेत. जे आमचे दुःख ओळखून आम्हाला तुमचे फोटो देतात... तुमच्या फोटोमुळे आमचे दुःख आनंदात परावर्तित होते... तुमचे फोटो वाटताना ते कधीही काडीचाही गर्व करत नाहीत... उलट बॅगा भरभरून तुमचे फोटो आम्हाला देताना तेच हात जोडून नमस्कार करतात... ते आमची निंदा करत नाहीत... उलट आम्ही तुमचे फोटो स्वीकारले म्हणून तेच आम्हाला नमस्कार करतात...
खरं सांगतो बापू, या निवडणुका पाहण्यासाठी तुम्ही हवे होतात... तुमची आठवण आमच्या आजूबाजूला असणारे उमेदवार भरून काढत आहेत हेही नसे थोडके...
- तुमचाच, बाबूराव