Join us  

महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी; ठाण्यात सौरभ राव, नवी मुंबईत डॉ. कैलाश शिंदे आज स्वीकारणार सूत्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 5:06 AM

ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी सौरभ राव तर नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी कैलाश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई : शांत, संयमी पण अत्यंत कार्यकुशल असा लौकिक असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी भूषण गगराणी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी बुधवारी नियुक्ती करण्यात आली. राज्य सरकारने पाठविलेल्या तीन नावांपैकी गगराणी यांच्या नावावर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले.

ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी सौरभ राव तर नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी कैलाश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राव आणि शिंदे गुरुवारी सूत्रे स्वीकारतील. मुंबई महापालिकेत डॉ. अमित  सैनी  व अभिजीत बांगर या दोन नव्या अतिरिक्त आयुक्तांचीही नियुक्ती झाली असून, या दोघांनीही बुधवारी पदभार स्वीकारला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव असलेले गगराणी हे महापालिका आयुक्त पदासाठी सर्वात प्रबळ दावेदार मानले जात होते. इक्बालसिंह चहल यांची बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिल्यानंतर गगराणी हेच या पदावर जाणार असे मानले जात होते. ते १९९० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 

कैलाश शिंदे नवी मुंबईतनवी मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त कैलाश शिंदे यांनी पालघरचे जिल्हाधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे सीईओ, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक या पदांवर काम केले आहे. पालघर जिल्ह्यात कोरोना काळात त्यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा झाली होती. 

सौरभ राव ठाण्यातठाणे महापालिका आयुक्तपदी नियुक्त करण्यात आलेले सौरभ राव यांनी यापूर्वी नागपूर, नंदुरबार व पुण्याचे विभागीय आयुक्त,  जिल्हाधिकारी म्हणून तसेच पुणे महापालिका आयुक्त म्हणूनही कार्य केले आहे. पुण्याच्या विकासकामांमधील योगदानासाठी त्यांचे अनेकदा कौतुक झाले आहे.

मराठीतून दिली होती आयएएसची परीक्षा भूषण गगराणी हे मराठीतून आयएएसची परीक्षा देणारे पहिले व्यक्ती आहेत. ते या परीक्षेत देशात तिसरे आले होते. नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे प्रधान सचिव, होते. माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालकही राहिले. सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी कार्याचा ठसा उमटवला. आरोग्य विभाग, पर्यटन महामंडळ, औद्योगिक विकास महामंडळ, राज्य रस्ते विकास महामंडळात अत्यंत महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम पाहिले.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाठाणे महानगरपालिकानवी मुंबई महानगरपालिका