रस्ते सुरक्षेसाठी महापालिका कटिबद्ध
By Admin | Updated: March 24, 2015 02:01 IST2015-03-24T02:01:25+5:302015-03-24T02:01:25+5:30
महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवर होणारे अपघात कमी व्हावेत व वाहतूक अधिकाधिक सहज व सुरळीत होण्यास मदत व्हावी,

रस्ते सुरक्षेसाठी महापालिका कटिबद्ध
मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवर होणारे अपघात कमी व्हावेत व वाहतूक अधिकाधिक सहज व सुरळीत होण्यास मदत व्हावी, या प्रमुख उद्देशाने एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने पाच वर्षे कालावधीसाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे; तसेच मुंबईतील रस्त्यांवरील सुरक्षेबाबत महापालिका सदैव कटिबद्ध व सजग आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी केले.
‘मुंबई रोड सेफ्टी इनिशिएटिव्ह’ या प्रकल्पांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या प्रारंभिक कार्यशाळेला मार्गदर्शन करताना सीताराम कुंटे बोलत होते. या कार्यशाळेला अतिरिक्त महापालिका आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त वेणुगोपाळ रेड्डी तसेच वाहतूक पोलीस शाखेचे अतिरिक्त आयुक्त कैसर खालिद हे उपस्थित होते.
कुंटे यांनी मोबाइल फोनसारख्या आधुनिक उपकरणांचा अमर्याद वापर व रस्त्यावर चालताना गाणी ऐकणे, फोनवर बोलणे यासारख्या बाबींमुळे दुर्दैवी अपघात होत असल्याचे नमूद केले. (प्रतिनिधी)