मुंबई : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी शिवाजी पार्क मैदानाला भेट दिल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर येथील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट दिली. यावेळी किमान अर्धा ते पाऊण तास आयुक्त आणि राज यांच्यात चर्चा झाली.
ही भेट फक्त या दोघांच्यातच झाल्याने मनसेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला भेटीच्या तपशीलाविषयी माहिती नव्हती. याबाबत गगराणी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, बऱ्याच दिवसांपासून शिवाजी पार्क मैदानाला भेट देण्याचे नियोजन होते.
तिथल्या स्थानिकांचा आग्रह होता आणि मलाही पाहणी करून समस्या जाणून घायच्या होत्या. त्या निमित्ताने मी गेलो होतो, त्याचवेळी मला राज ठाकरे यांचा फोन आला. चहा प्यायला घरी या, असे निमंत्रण त्यांनी मला दिले. पाहणी दौरा आटपून मी त्यांच्या घरी गेलो. चहापान झाले, थोड्या गप्पा झाल्या. या भेटीत विशेष असे काही नव्हते.