मुदत संपली तरी नगराध्यक्षांची निवड नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2015 01:36 IST2015-05-11T01:36:47+5:302015-05-11T01:36:47+5:30
१० मे रोजी नगराध्यक्षपदाची मुदत संपलेली असतानाही अद्याप या पदाची निवडणूक जाहीर झालेली नाही.
मुदत संपली तरी नगराध्यक्षांची निवड नाही
अंबरनाथ : दि. १० मे रोजी नगराध्यक्षपदाची मुदत संपलेली असतानाही अद्याप या पदाची निवडणूक जाहीर झालेली नाही. २३ एप्रिल रोजी पालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला असतांनाही अद्याप नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यातच नगराध्यक्षाची मुदत संपल्यावर त्यांना मुदतवाढ देणार की उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार देणार, हेदेखील अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या निकालानंतर १० मे रोजी जुन्या नगरसेवकांची आणि नगराध्यक्षांची मुदत संपली आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांची निवड १० मेआधीच होणे गरजेचे होते. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अद्याप ही निवडणूक जाहीर करण्यात आलेली नाही. त्यातच नगराध्यक्षांची मुदत संपल्याने त्यांना मुदतवाढ देण्याची किंवा त्यांचा पदभार सांभाळण्यासाठी उपजिल्हाधिकारी यांची नेमणूक करणे गरजेचे आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतेच आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून आलेले नाहीत.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विलंब होत असल्याने अंबरनाथ आणि बदलापुरात सत्ता स्थापण्यासाठी पुढाकार घेत असलेल्या शिवसेनेच्या गोटात नाराजी पसरली आहे. निवडणुकीसाठी विलंब होत असल्याने विरोधी गोटातील पक्षही शिवसेनेला धक्का देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. निवडणुकीला विलंब होत असल्याने नगरसेवकांना आपल्याकडे वळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात घोेडेबाजार रंगल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)
बदलापुरात शिवसेनेला भाजपा सुरुंग लावणार ?
४बदलापुरात शिवसेनेला पूर्ण बहुमत असले तरी त्यांच्या नगरसेवकांना फोडून चमत्कार करण्याची तयारी भाजपाच्या गोटातून सुरू आहे. तर, शिवसेनेचा एकही नगरसेवक फुटणार नसून भाजपाच्याच काही नगरसेवकांना निवडणुकीच्या दिवशी गैरहजर राहण्यासाठी शिवसेना गळ घालत आहे. एकमेकांना शह देण्यासाठी बदलापुरातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातही नगराध्यक्षपदाच्या आरक्षणावरूनही गोंधळ उडाला असून ते आरक्षण बदलण्याचा प्रयत्न भाजपाच्या गोटातून सुरू असल्याची चर्चा शहरात आहे.
४अंबरनाथमध्ये शिवसेना अपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार असली तरी नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.