Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस बळ वापरून कोस्टल रोडचे काम जबरदस्तीने सुरू करण्याचा पालिकेचा प्रयत्न; मच्छिमारांनी हाणून पाडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 17:00 IST

Costal Road एक महिन्यापेक्षा जास्त काळ निघून गेला तरी अद्याप येथील दोन पिलर मधील अंतराचा वाद आटोक्यात आला नसून हा मुद्दा जैसे थे आहे आणि याला शासन व प्रशासन जबाबदार आहेत

लोकमत न्यूक नेटवर्क मुंबई -मुंबई महानगर पालिकेने पोलिसांचा बळ वापरून आज कोस्टल रोडचे काम जबरदस्तीने सुरू करण्याचा प्रयत्न केला. परंतू महानगर पालिकेच्या हा प्रयत्न वरळी कोळीवाड्यातील स्थानिक मच्छिमारांनी आक्रमक पद्धतीने आज हाणून पाडला.दि,१९ नोव्हेंबर रोजी सुद्धा मच्छिमारांनी येथील कोस्टल रोडचे काम बंद पाडले होते.

 एक महिण्यापेक्षा जास्त काळ निघून गेला तरी अद्याप येथील दोन पिलर मधील अंतराचा वाद आटोक्यात आला नसून हा मुद्दा जैसे थे आहे आणि याला शासन व प्रशासन जबाबदार आहेत असा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी केला.

कोस्टल रोज प्राधिकरणाच्या मनमानी काराभारामुळे इथल्या स्थानिक मच्छिमारांनी दि, ३० ऑक्टोबर रोजी कोस्टल रोडचे काम बंद पाडत आंदोलन केले होते. याबाबत मुंबईचे पालकमंत्री व राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दि,११ नोव्हेंबर रोजी वरळी कोळीवाड्याला भेट दिली होती. 

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण या विषयावर बोलणार आहे, लवकरच त्यावर तोडगा काढू असं आश्वासन त्यांनी दिले.मात्र अजून या वर तोडगा निघाला नाही.आणि पालिका प्रशासन पोलीस बळाचा वापर करून कोस्टल रोडचे काम सुरू करत आहे.त्याला वरळी येथील मच्छिमारांचा ठाम विरोध असल्याचे वरळी कोळवाडा नाखवा मत्स्यव्यवसाय सहकारी सोसायटी लिमिटेडचे सेक्रेटरी नितेश पाटील व रॉयल पाटील यांनी लोकमतला दिली.मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्याशी संपर्क साधला आहे,मात्र अजून त्यांच्या कडून उत्तर आले नाही अशी माहिती नितेश पाटील यांनी दिली.

शासनाकडून मच्छिमारांना आतापर्यंत देण्यात आलेली लज्जास्पद वागणूक देण्यात आली.एवढे होऊन सुद्धा या विषयावर तोडगा काढण्याचे सोडून पोलीस बळाचा वापर केला जात असल्यामुळे मच्छिमार समाजामध्ये शासनाच्या विरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे असे येथील विजय पाटील व जॉन्सन कोळी यांनी सांगितले.